
कौटुंबिक कलहातून एका शेतकऱ्याने जे केलं त्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याने आधी शेतात काम करणाऱ्या दोन किशोरवयीन कामगारांना कुऱ्हाडीने वार करून संपवले. त्यानंतर स्वतःसह पत्नी आणि दोन मुलांना घरात कोंडून घेत पेटवून दिले. या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. या आगीत घरात बांधलेली गुरेही जिवंत जळाली. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील रामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. विजय मौर्य असे आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय मौर्यने तीन किशोरवयीन कामगार – सूरज यादव (14), सनी वर्मा (14) आणि किशन यांना सकाळी लसूण कापणीसाठी बोलावले होते. दोन्ही किशोरवयीन मुले शेजारच्या गावातील रहिवासी आहेत आणि विजय मौर्यच्या शेतात नेहमी कामासाठी येत होते. काम करत असताना विजय मौर्यने अचानक किशनला झाडाची फांदी तोडून आणण्यास सांगितले. किशन परतला तेव्हा घराला आग लागली होती. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना सहा जणांचे मृतदेह आढळले.
कौटुंबिक कलहातून विजय मौर्यने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होत पुरावे गोळा केले. प्राथमिक तपासात विजय मौर्य अस्वस्थ असल्याचे समोर आले, असे रामगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पीक नुकसान आणि कौटुंबिक कलहामुळे विजय गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता.






























































