
मध्य प्रदेशमधील छिंदवारा येथे कफ सिरपमुळे सहा बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कफ सिरपमुळे या सर्व बालकांच्या किडन्या निकामी पडल्या असून त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बायोप्सी अहवालात म्हटले आहे. या सर्व घटना गेल्या 15 दिवसांतील असून त्यामुळे दोन कफ सिरपवर बंदी घालण्यात आले आहे.
मृतांमधील सर्व मुलं ही पाच वर्षांच्या खालच्या वयाची आहेत. या सर्व मुलांना खोकला ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरने त्यांना एक कफ सिरप व काही औषधे लिहून दिली होती. त्याने ती मुलं बरी देखील झाली. मात्र नंतर पुन्हा त्यांना ताप आला व त्याना लघवीला त्रास होऊ लागला. तसेच काही मुलांमध्ये लघवी होणेच बंद झाले होते. या मुलांची तब्येत अवघ्या काही दिवसात इतकी बिघडली की त्यांच्या किडन्या निकाम्या झाल्या. या मुलांना त्यांच्या पालकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्या कफ सिरपचा किडनीवरील परिणाम इतका जास्त होता की उपचारांआधीच मुलांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या.
या सर्व मुलांचे बोयोप्सी अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या शरीरात डायथीलेन ग्लायकॉल कंटॅमिनेशन हे टॉक्सिक केमिकल आढळून आले. या सर्व मुलांनी मृत्यूच्या काही दिवस आधी कोल्ड्रीफ व नेक्स्ट्रो डीएस ही कफ सिरप घेतली होती. या घटनांनंतर छिंदवाडाच्या कलेक्टरने या दोन्ही कफ सिरपवर बंदी घातली आहे.