एल्फिन्स्टन पूल बंदमुळे ‘लालपरी’ला मोठा फटका, रोज एसटीच्या 180 हून अधिक गाडय़ांची रखडपट्टी

ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल बंद केल्यापासून एसटी महामंडळाच्या बस वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. परळ एसटी आगारातून राज्याच्या ग्रामीण भागात ये-जा करणाऱया 180 हून अधिक बसचे वेळापत्रक कोलमडले आहे. या गाडय़ांची दररोज दादर पूर्व ते परळ आगारापर्यंतच्या प्रवासात अर्धा ते एक तास रखडपट्टी होत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाला इंधन आणि वेळ अशा दोन्ही टप्प्यांवर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

परळ एसटी आगार शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने कोकण तसेच राज्याच्या इतर भागांत जाणारे प्रवासी याच आगारातून एसटी प्रवास सुरू करतात. येथून रोज 186 बसगाडय़ांची ये-जा सुरू असते. गेल्या महिन्यात प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल बंद केल्यापासून या गाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक पोलिसांनी एसटीला चिंचपोकळी पुलावरून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायी मार्गाचा वळसा एसटीसाठी अधिक डोकेदुखीचा ठरला आहे. या मार्गावर रोज सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूककाsंडी होत असल्याने एसटीच्या बसफेऱयांची दादर पूर्व ते परळ एसटी आगार या सात किमी प्रवासात अर्धा ते एक तास रखडपट्टी होत आहे. एसटीच्या ताफ्यात बहुतांश गाडय़ा डिझेलवर चालणाऱया आहेत. या गाडय़ा तासभर वाहतूककाsंडीत अडकल्याने इंधनाचाही मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.

इलेक्ट्रिक बसेसचा अधिक खोळंबा

एसटी महामंडळाने अनेक इलेक्ट्रिक बसेस प्रवासी सेवेत दाखल केल्या आहेत. यापैकी बहुतांश गाडय़ा दादरमधून चालवल्या जातात. मात्र या बसेस चार्ंजगसाठी परळ आगारातील चार्ंजग पॉइंटवर नेल्या जातात. त्यांना केवळ चार्ंजगसाठी दादर ते परळ असा दुहेरी प्रवास करावा लागत आहे.

त्यामुळे या बसेसचा अधिक खोळंबा होत आहे.प्रवाशांची समजूत काढताना दमछाक

दादरहून सुटणाऱया बसगाडय़ांना परळ आगारातून येईपर्यंत अर्धा ते एक तास विलंब होतो. नियोजित वेळेपेक्षा उशिराने गाडय़ा सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांची समजूत काढताना एसटी कर्मचाऱयांची दमछाक होत आहे.