ठाणे महापालिकेत लाचखोर अधिकाऱ्यांचे ‘रावणराज’, लाचखोर अतिक्रमण उपायुक्त शंकर पाटोळेंचा आका कोण?

ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनीच अतिक्रमण विभागाचे आयुक्त शंकर पाटोळे यांना मुख्यालयात लाच घेताना अटक केल्याने प्रशासन हादरून गेले आहे. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे महापालिकेत लाचखोर अधिकाऱ्यांचे ‘रावणराज’ सुरू असल्याचे दिसून आले आहे. अधिकाऱ्यांच्या टेबलावर वजन ठेवत नाही तोपर्यंत कोणतीही फाईल पुढे सरकत नाही अशी चर्चा असून लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांचा आका कोण? असा थेट सवाल ठाणेकरांनी केला आहे. बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पाटोळे यांनी ६० लाख रुपये मागितले. त्यातील १० लाख त्यांनी आधीच घेतले, तर उर्वरित १५ लाखांचा पहिला हप्ता घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पाटोळे यांच्यानंतर कोणाचा नंबर लागणार असाही प्रश्न विचारण्यात येत आहे.

अभिराज डेव्हलपर्सचे अभिजित कदम यांचे नौपाडा येथील भक्तीमंदिर रोड या ठिकाणी कार्यालय आहे. त्यांनी जागामालक अनंत मढवी यांच्या मालकीची ही जागा विकसित करण्यासाठी घेतली होती. या जागेत तीन दुकाने बेकायदा असून त्याची तक्रार जागामालक अनेक वर्षे पालिकेत करीत होते. मात्र कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर कदम यांची मंदार गावडे आणि सुशांत सुर्वे यांच्याशी ओळख झाली. त्या दोघांनी कदम यांची पाटोळे यांचा सहकारी संतोष तोडकर यांची भेट करून दिली.

मुख्यालयाजवळ या…

पाटोळे यांनी कदम यांना पाचपाखाडी येथे येण्यास सांगितले. त्यानंतर मुलुंड येथील संतोषी माता मंदिर येथे या असा निरोप दिला. मात्र मंदिराजवळ नको पालिका मुख्यालयातच या असे सांगितले. त्यानुसार मुख्यालयाबाहेर पाटोळे यांनी कदम यांना लाचेची रक्कम गाडीत ठेवण्यास सांगून एकटेच कार्यालयात भेटण्यास सांगितले. त्यानंतर डाटा ऑपरेटर ओमकार गायकर याला गाडीतील रक्कम आणण्यास पाठवले असता एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

कोऱ्या कागदावर लिहिला लाचेचा आकडा

लाचखोर पाटोळे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन देत एका कागदावर २० लाख रकमेचा आकडा लिहून सदर रक्कम कारवाईकरिता द्यावी लागेल असे सांगून तोडकर यांच्याशी बोलण्यास सांगितले. कदम यांनी कारवाईकरिता १० लाख सुशांत सुर्वे या ‘कलेक्टर’च्या खात्यात जमाही केले. ही रक्कम जमा झाल्यानंतर ३१ जुलै ते १९ ऑगस्टच्या दरम्यान तीनही अनधिकृत गाळ्यांना दोन नोटिसा दिल्या, परंतु या गाळ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कदम यांनी पुन्हा २६ सप्टेंबर रोजी पाटोळे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान पाटोळे यांनी कदम यांना एका कागदावर ‘५० लाख’ असे लिहून पुन्हा लाचेची मागणी केली.