
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याला पावसाने झोडपून काढले. अनेक भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरला असला तरी आता जगण्याची संघर्ष सुरू झाला आहे. तालुक्यातील औराद शहाजानी या मोठ्या बाजारपेठ असलेल्या व सीमावर्ती भागातील कर्नाटक-महाराष्ट्र राज्यातील गावांना जोडणाऱ्या भागातील रस्ता वाहून गेल्याने पाच ते सहा गावचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
औराद शहाजानी हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. या गावाला राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता तसेच हडप मार्केट व इतर मार्केट व शैक्षणिक सुविधा तसेच आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या भेटत असल्यामुळे कर्नाटक राज्यातील वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागातील लोक या गावाला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी येतात. त्यामुळे औराद शहाजानी येथील मोठी आर्थिक व्यवहार उलाढाल होत असते. मागच्या दोन-तीन आठवड्यापासून पूर परिस्थितीने घेरल्यामुळे अगोदर रस्ता बंद होता.
पूर ओसरल्यावर सर्व ठीक होईल असे वाटत होते. मात्र पुराच्या पाण्यात रस्ते वाहून गेल्याने आणि आहे त्या रस्त्यांना मोठे खड्डे पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. याचा परिणाम औराद शहाजानी येथील बाजारपेठेवर झाला असून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कर्नाटक राज्यातील भालकी व महाराष्ट्र राज्यातील वलांडी व उदगीर बाजारपेठ या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
तीन आठवड्यांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीमुळे तेरणापात्र व मांजरा नदीकाठच्या संगमावर शेतीसह अनेक रस्ते सुद्धा वाहून गेले आणि मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे आरोग्य, शिक्षण व दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सरकारने लवकरात लवकर रस्ते वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.
औराद शहाजनी ते हालसी रस्ता गेला वाहून
लातूर जिल्ह्यात या वर्षी पावसाने धुमाकूळ घातला. नदीपात्रात विविध प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नद्या दुथडी भरून पाञाच्या बाहेर वाहात असल्याचे दिसून आले. मांजरा नदीवरील औराद शहाजनी ते हालसी येथील रस्ता पुलासह वाहून गेला आहे. गेल्या 22 दिवसांपासून हा रस्ता बंद आहे. हालसी गावातील सर्व व्यवहार आणि इतर दैनंदिन कामे औराद शहाजनी येथे होतात. त्यामुळे लोकांना खड्डे पडलेल्या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करा वागत आहे.