लडाखमध्ये वांगचुक यांची चूक असेल तर, मणिपूरमध्ये कोण चुकलं? मणिपूर का पेटलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला परखड सवाल

लडाख आणि मणिपूरमधील हिंसाचारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा केंद्र सरकारला घेरले आहे. सोनम वांगचुक यांनी काय चूक केली होती? काल परवापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते. मग असं नेमकं काय घडलं? सोनम वांगचुक यांनी जर का चूक केली असेल तर, मणिपूरमध्ये चूक कुणी केली होती? का पेटलं मणिपूर? असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

केवळ माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे, आला पाहिजे. पण सत्ता आल्यानंतर पुढे काय? सत्ता कशासाठी पाहिजे? का म्हणून तुम्हाला सत्तेत यायचं आहे? आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश कधी सांभाळणार आहात की नाही? राज्य म्हणून कधी सांभाळणार आहात की नाही? केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही? मधल्या काळ मी असं म्हटलं होतं आणि आजही माझं मत आहे की, आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे. गृहमंत्र्यांची गरज आहे. अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. कारण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत, देशाचे नाहीत. देशाचे म्हणून कारभार कुठेय? ज्या सोनम वांगचुक यांचा उल्लेख मी केला आपण किती लोकं त्यांच्याबद्दल बोलतोय? किती लोकांना सोनम वांगचुक माहिती आहे? काय त्यांनी असा गुन्हा केला होता? काय म्हणून त्यांना थेट ‘रासुका’मध्ये अटक केली. काय एवढं मोठं राष्ट्रविघातक काम, काय वांगचुक यांनी चूक केली होती? काल परवापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते. मग असं नेमकं काय घडलं? सोनम वांगचुक यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कुणी केली होती? का पेटलं मणिपूर? आता सुद्धा आपल्याकडे बातम्या येतचं नाही. आपलं कर्तव्य आहे बातम्या दाखवणं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अन्याय दिसेल तिथे ढुंगणाला लाथ मारणं हे आमचं कामच आहे, उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत घेतला भाजपचा समाचार

हिंदुत्व म्हणजे काय? देशप्रेम म्हणजे काय? या सगळ्या गोष्टीचा थोडक्यात परवा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती ही लोकं येतात की, तुम्ही हिंदुत्व सोडलं का? अरे तुम्ही तुमच्या वंशावळीत बघा कोणी-कोणी काय-काय सोडलं आहे. जेव्हा आम्ही भाजपच्या सोबत होतो तेव्हा आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो. आणि भाजपला आम्ही सोडलं म्हणजे काय हिंदुत्व सोडलं का? आम्ही केवळ भाजपला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर मग मोहन भागवत यांनी १०० वर्षे संघाची पूर्ण झाल्यानंतर १०० वर्षे या संघाच्या पिढ्या ज्यांनी खस्ता खाल्ल्या, खपल्या आणि कष्ट घेतले त्या कष्टाला आज जी काही विषारी फळं लागली आहेत, हेच तुमचं शंभर वर्षाचं फलित आहेत का? कारण स्वतः मोहन भागवत हे मशिदीत जातात. भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांकांना सदस्य करून घेत आहेत. कधी सौगात-ए-मोदी वाटतातहेत. आम्ही काँग्रेसबरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, सौगात-ए-नेहरू कधी पाहिलं का तुम्ही? सौगात-ए-इंदिरा गांधी ऐकलं का तुम्ही? मग सौगात-ए-मोदी वाटणारे हे हिंदू कसे? असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला घेरले.

जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कुठलेही संबंध ठेवू नका, हे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं आणि तेच आम्ही परत परत सांगतोय. भाजपनेच सांगितलंय की पहलगामध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. मग तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत. आणि ज्यांनी अतिरेकी पाठवले होते त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही चंद्राबाबूंसोबत गेलात मग चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? नितीशकुमार हिंदुत्ववादी आहेत का? भाजपने ३२ लाख मुस्लिमांना सौगात-ए-मोदी वाटली तरी भाजप हिंदुत्व वादी. याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद, असं कसं काय होऊ शकतं? हा प्रश्न विचारण्याची ताकद ही पत्रकार गमवून बसलेत का? का नाही विचारत, जर लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्न विचारू शकत होते. तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमवून बसलो आहोत का? आणि जोर आपण गमवून बसलो असू तर मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? निदान पत्रकारांनी निष्पक्षपातीपणाने दूध का दूध पाणी का पाणी? हे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. आणि आता जे काही एक अंधभक्त हा वर्ग जन्माला आलेला आहे त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याची जबाबदारी ही पत्रकारांची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.