कॅश ऑन डिलिव्हरीआडून नफेखोरी, हातचलाखी करून अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या कंपन्यांवर होणार कारवाई

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स ग्राहकांकडून कॅश ऑन डिलिव्हरीच्या आडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारीनंतर अखेर केंद्र सरकारला जाग आली आहे. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत सरकारने अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहे.

कंपन्यांकडून करण्यात येत असल्याच्या या प्रकाराला डार्क पॅटर्न म्हटले जाते. ग्राहकांना ऑनलाइन खरेदी करताना एखाद्या वस्तूची एक ठराविक रक्कम दाखवली जाते. परंतु, नंतर त्या वस्तूला छुप्या पद्धतीने वेगवेगळे चार्ज आकारून त्या वस्तूची किंमत वाढवली जाते. हातचलाखी करणाऱया अशा कंपन्यांविरोधाक कडक पावले उचलली जातील. ज्या कंपन्या उल्लंघन करतील, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांने म्हटले आहे. बऱयाच ई-कॉमर्स कंपन्या ऑर्डर करताना दाखवलेल्या किंमतीव्यतिरिक्त नंतर कॅश ऑन डिलिव्हरीचे चार्ज जोडून किंमत वसूल करतात. तसेच ऑर्डर कॅन्सल केल्यानंतर रिफंड देण्यासही काही कंपन्या मुद्दामहून उशीर करतात, टाळाटाळ करतात. या सर्व प्रकरणांची कसून चौकशी केली जाईल. तसेच दोषी आढळणाऱया ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सला चौकशीसाठी बोलावले जाईल, असे केंद्रातील एका अधिकाऱयाने सांगितले.

छुपी फी आकारली जाते

एखाद्या ग्राहकाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरून कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्या ग्राहकाकडून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स वेगवेगळ्या कॅटेगरी अंतर्गत छूपी फी आकारतात. ऑफर हँडलिंग फी, पेमेंट हँडलिंग फी, प्रोटेक्ट प्रोमिस फी, रेन हँडलिंग फी, कॅश ऑन डिलिव्हरी फी यासह अन्य काही माध्यमांतून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे उकळले जातात. या सर्व फी चेक आउट करताना दाखवले जातात. कधी कधी तर वस्तूंची दाखवलेली किंमत आणि एकूण पे केली जाणारी एकूण किंमत यांच्यातही बरीच तफावत असते. बरेच ग्राहक सर्व वस्तूंच्या पैशांची टोटल करत नाहीत. याचा गैरफायदा काही कंपन्या घेतात.

काय आहे ‘डार्क पॅटर्न’

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन साइट्सवर डार्क पॅटर्नचा वापर केला जातो. ग्राहकांची जाणीवपूर्वक दिशाभूल केली जाते. डार्क पॅटर्नमध्ये छुप्या किंमती चेकआऊट करताना दिसतात. ऑनलाइन शॉपिंग करताना कार्टमध्ये गुपचूपपणे एखादी वस्तू जोडली जाते. एक्सेप्ट बटनला ब्राइटमध्ये दाखवले जाते. तर रिजेक्ट बटनाला लपवले जाते किंवा छोटे केले जाते. तसेच ओन्ली वन आयटम लेफ्ट, लिमिटेड टाइम ऑफर्स यासारखे शब्द जाणीवपूर्वक दाखवले जाते.