
>> कुणाल पवारे
गत सहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कुंडलवाडी शहर व परिसरात दि.5 आँक्टोबर रोजी सांयकाळी 5 वाजेपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीपातील उरले सुरलेले सोयाबीन पीक काढणीच्या कामांना सुरुवात केली होती.मात्र रविवारी सांयकाळी पाचच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल होऊन आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.
गत दोन महिन्यांत कुंडलवाडी शहर व परिसरात पावसाने केलेल्या तुफान बँटिंगमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.खरीप हंगामातील अतिवृष्टी च्या तडाख्यामुळे शेतकरी पुरता हादरला आहे. खरीप हंगाम तर पूर्ण हातातून गेला आहे.यंदा निसर्ग कोपला असून पावसाने दाणादाण उडवली आहे.आँगस्ट व सप्टेंबर अखेर पर्यंत पावसाने सतत झोपून काढल्याने हजारो हेक्टर वरील शेतातील पिके खरडून गेली आहेत. अशा भयानक परिस्थितीत कुंडलवाडी शहर व परिसरात सध्या उरले सुरलेले सोयाबीन काढणी सुरू आहे.शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची कापणी करून वाळवणीसाठी टाकलेली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शिल्लक शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसाने सोयाबीन पूर्ण भिजून जाऊन दर्जा घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत.