
परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कॅब, टॅक्सी, रिक्षा चालक एकदिवसीय संप पुकारणार आहेत. यामुळे गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी दिवसभर प्रवासी सेवा बंद राहणार आहेत. 15 जुलै 2025 पासून आझाद मैदान येथे परिवहन विभागाच्या गैर कारभाराविरोधात कॅब, रिक्षा व टॅक्सीचालकांचे आंदोलन सुरू आहे.
30 सप्टेंबर 2025 रोजी, परिवहन मंत्र्यांनी भेट नाकारल्यामुळे आंदोलकांनी जेलभरो आंदोलन करत शेकडो आंदोलकांनी स्वतःला अटक करून घेतले. ओला, उबेर, रॅपिडो या तीनही कंपन्या सरकारी नियमांना पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे राज्यात काम करत आहेत. अनेक एफआयआर दाखल केल्यानंतरही खाजगी दुचाकीवरून प्रवासी सेवा चालूच आहे.
यानंतर मुख्यमंत्र्यांचे सचिव विद्याधर महाले यांनी आंदोलक आणि परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र परिवहन विभाग या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे.
9 ऑक्टोबर 2025 रोजी देशभरातील वित्त विषयाचे तज्ञ मुंबईत कॉन्फरन्ससाठी येणार आहेत. यावेळी पंतप्रधानांचे लक्ष परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे वेधण्यासाठी आंदोलकांनी 9 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे भारतीय गिग कामगार मंचचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितले. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो. तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते.