पुण्यात पोलीसही असुरक्षित, कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार; लॉ कॉलेज रस्त्यावरील घटना

शहरात दिवसेंदिवस रस्त्यांवर होणाऱ्या वादालादीतून मारहाणीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यातून होणाऱ्या भांडणामुळे थेट टोळक्याकडून घातक शस्त्रांनी वार करून संबंधितांना गंभीर जखमी केले जात आहे. दुचाकीस्वार चोरटय़ांच्या धुडगुसामुळे पादचारी महिला, मुलींसह ज्येष्ठ महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता पोलिसावरच कोयत्याने हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

कामावरून घरी चाललेल्या गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला वाहने आडवी चालवून अडथळा निर्माण केल्याची घटना लॉ कॉलेज रस्त्यावर घडली. जाब विचारणाऱ्या पोलिसावर दुचाकीस्वार टोळक्याने कोयत्याने वार करून गंभीररीत्या जखमी केले आहे. अमोल काटकर असे गंभीररीत्या जखमी झालेल्या अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारासह साथीदारांविरुद्ध डेक्कन जिमखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पुण्यात पोलिसांवरील हल्ले वाढले, 36 घटना

मागील काही दिवसांपासून पोलिसांवर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दीड वर्षात शहरात वेगवेगळय़ा घटनेत 36 पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. हडपसर भागातील कृष्णानगर भागात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पोटात लाथ मारण्याची घटना घडली होती. तसेच पुणे स्टेशन परिसरात नाकाबंदी करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घातली होती. त्यामुळे पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होत चालले असल्याचे बोलले जात आहे.