
हिंदुस्थानी महिला संघाची दिग्गज माजी खेळाडू आणि यशस्वी कर्णधार मिताली राजच्या नावाने विशाखापट्टणम क्रिकेट स्टेडियमवरील स्टँड झळकणार आहे. त्याचबरोबर माजी यष्टीरक्षक-फलंदाज रवि कल्पानाचे नाव सुद्धा एका स्टँडला दिले जाणार आहे. या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला जाणार असून 12 ऑक्टोबर रोजी दोन्ही स्टँडचे अनावरण केले जाणार आहे. टीम इंडियाची विस्फोटक फलंदाजी स्मृती मानधनाने ही मागणी केली होती.
आंध्र क्रिकेट संघाने (ACA) मिताली राज आणि रवि कल्पना यांचे हिंदुस्थानी क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. दोघींचाही प्रवास येणाऱ्या पीढीला मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देणारा असल्याचं सुद्धा ACA ने म्हटलं आहे. दरम्यान, स्मृती मानधनाने ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘Breaking The Boundaries’ या कार्यक्रमात बोलत असताना आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांना स्टँडला नावं देण्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिच्या या मागणीचा प्रस्ताव स्विकारला आणि मंत्री नारा लोकेश यांनी आंध्र क्रिकेट असोसिएशनची चर्चा केली. त्यानंतर मिताली राज आणि रवि कल्पना यांचे नाव स्टँडला देऊन त्यांचा सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. 12 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे वर्ल्डकपमधील सामना विशाखापट्टणम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी स्टेडियमवरील दोन स्टँडला मिताली राज आणि रवि कल्पना यांची नावे देण्यात येणार आहेत.