फटकेबाजीसाठी पंत सज्ज होतोय, रणजीतून मैदानात परतणार; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पुनरागमनाची तयारी

टीम इंडियाचा धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा आपली बॅट तळपण्यासाठी, गोलंदाजांना फोडून काढण्यासाठी सज्ज झाला आहे. दीर्घ पुनर्वसनानंतर तो 25 ऑक्टोबरपासून रणजी करंडकाच्या दुसऱ्या फेरीत मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या पुनरागमनाची शक्यता अधिक बळावली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या पायाच्या प्रॅक्चरनंतर पंतचा पुनर्वसनाचा प्रवास अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या आठवडय़ाच्या अखेरीस तो बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे महत्त्वाची फिटनेस चाचणी देणार आहे. पायावरील प्लास्टर काढल्यानंतर पंतने मोबिलिटी, वेट ट्रेनिंगसोबतच फलंदाजीचा सरावही जोरात सुरू केला आहे. बोर्डाच्या सूत्रांनुसार 10 ऑक्टोबरपर्यंत त्याला हिरवा पंदील मिळण्याची शक्यता आहे.

दिल्लीचा रणजी हंगाम 15 ऑक्टोबरला हैदराबादविरुद्ध सुरू होतो, मात्र पंत पहिल्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत अजून शंका आहे. फिरोजशाह कोटला मैदानावर हिमाचलविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याच्या पुनरागमनाची शक्यता सर्वाधिक आहे.

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळताना पंतच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. स्पॅनमध्ये प्रॅक्चरचे निदान झाल्यानंतर तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला. तरीही पुढील दिवशी त्याने फलंदाजी केली, पण यष्टिरक्षण करू शकला नाही. त्या मालिकेत पंतने चार कसोटी सामन्यांत तब्बल 479 धावा ठोकल्या, ज्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.

पंतच्या अनुपस्थितीत सध्या टीम इंडियात ध्रुव जुरेल आणि एन. जगदीशन या जोडीला संधी मिळत आहे. तरीही पंतने रणजीत फिटनेस सिद्ध केल्यास नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो संघात पुन्हा यष्टीमागे दिसू शकतो.

हा दौरा 14 नोव्हेंबरला कोलकात्यातील पहिल्या कसोटीपासून सुरू होईल. या मालिकेत 2 कसोटी, 3 वन डे आणि 5 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. चाहत्यांसाठी पंतचे पुनरागमन म्हणजे जणू जुना आक्रमक सूर पुन्हा ऐकायला मिळणार आहे.