
तीन दशकांपासून चर्चेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या सोहळ्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि कलागुणांचे दर्शन होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासह अनेक नृत्याविष्कार आणि लोककला या ठिकाणी सादर होणार आहेत. लावणी, दहीहंडी, गोंधळ, कोकणातील झेलक्यांचा ठेका, आदिवासी नृत्य आणि आगरी-कोळी नृत्य आदी कलाविष्कार सुमारे 60 कलाकार सादर करणार आहेत. पंतप्रधान दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर तीनच्या सुमारास उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
उलवे परिसरातील 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती करण्यात आली आहे. या विमातळावर एकूण चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी असणार आहेत. त्यापैकी पहिल्या टर्मिनलचे आणि एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या याच पहिल्या टप्प्याचे उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाची जोरदार तयारी सिडको आणि विमानतळ हाताळणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीने केली आहे. उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. अनेक नृत्याविष्कार आणि लोककला सादर होणार आहेत. लावणी, दहीहंडी, गोंधळ, कोकणातील झेलक्यांचा ठेका, आदिवासी नृत्य आणि आगरी-कोळी नृत्य आदी कलाविष्कार सुमारे 60 कलाकर सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुमारे दोन तास विमानतळावर थांबून टर्मिनल एक, धावपट्टी, टॅक्सी रन वे आदींची पाहणी करणार आहेत. या कार्यक्रमासाठी 50 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर रचना
या विमानतळाची रचना लंडनमधील हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या असणार आहेत. चारही टप्प्यांचे काम झाल्यानंतर विमानतळाची वार्षिक क्षमता नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची होणार आहे. त्यापैकी पहिल्या टर्मिनलचे उद्घाटन उद्या होत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्वच रस्त्यांवर उद्या सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधतीत जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सर्व रस्त्यांवर वाहनांची पार्किंग करण्यासही मनाई करण्यात आली आहे.