अतिवृष्टीच्या तडाख्याने मराठवाड्यातील मेलेल्या नद्या जिवंत झाल्या! पावसाळ्यात इंचभरही पाणी न येणार्‍या नद्यांनी चार चार वेळा पात्र बदलले, हवामान बदलाचा विपरीत परिणाम

>> महेश कुलकर्णी

गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्याचे ऋतुचक्र बदलले असून हवामान बदलाचा मराठवाड्यावर विपरीत परिणाम होत आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने मराठवाड्यातील अनेक मृतवत झालेल्या नद्या जिवंत झाल्या! नद्या केवळ जिवंतच झाल्या नाहीत, तर या नद्यांनी चार चार वेळा पात्र बदलले. वाळूसाठी होणारी नद्यांची उरफोडी, नद्यांच्या जीवावर उठलेल्या अतिक्रमणांनी या नद्या जवळपास मृतच झाल्या होत्या. परंतु अतिवृष्टीने या नद्या मूळ रूपात आल्या, एवढेच नाही तर त्यांनी धारण केलेल्या रौद्ररूपाने हाहाकार उडवला.

मराठवाडा हा पाणीसंपन्न प्रदेश म्हणून कधीच ओळखला गेला नाही. पर्जन्यछायेतील या प्रदेशात जेमतेम पडणार्‍या पावसाच्या भरवशावर येथील शेतशिवाराबरोबर माणसाचीही तहान भागत होती. देशात हरितक्रांतीचे नगारे वाजत होते आणि मराठवाड्यात पाणीक्रांती होत होती. याच काळात या भागात नालाबंिंडगच्या माध्यमातून अनेक बंधार्‍यांची कामे झाली. मांजरा, तेरणाबरोबरच जायकवाडीची निर्मितीही याच काळातली. येलदरी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, निम्न दुधना त्यानंतरच्या काळात झाले. गोदावरी, मांजरा, तेरणा, सिंदफणा, दुधना, पूर्णा, बिंदुसरा, शिवना नद्यांनी आपापले काठ समृद्ध केले. नद्यांनी माणसांची काळजी घेतली, पण माणसाने मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी नद्या अक्षरश: मारल्या. नद्यांच्या दोन्ही काठावर काही जमीन मोकळी असावी, त्यावर वाढलेले गवत पूरनियंत्रणाचे काम करते. नद्या वाळूची निर्मिती स्वत:साठी करतात. पण वाळूसाठी नद्यांचा जीवच घेतला गेला.

बीड जिल्ह्यातील गोदावरी, सिंदफणा, कुंडलिका, बिंदुसरा, मांजरा या नद्या आपल्याला माहिती आहेत. वांजरा, अमृता, करपरा, नारदा, कडा या नद्या विस्मृतीत गेलेल्या, पण सप्टेंबरमधील अतिवृष्टीने या नद्या जिवंत झाल्या. नुसत्या जिवंतच झाल्या नाहीत, तर या नद्यांनी हाहाकार उडवला. कडा नदीने सप्टेंबरमध्ये तीन वेळा पात्र बदलले. नदीकाठावर करण्यात आलेले अतिक्रमण कडा नदीने महापुरात बुडवले.

नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, लेंडी, मन्याड, मांजरा, आसना या नद्या परिचित आहेत. उलुपी, गांजोटी, खेरी, नल्ली, मण्यार, वेणीथोरा, सरस्वती, हरणी, सीता या नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर होत्या. मात्र सप्टेंबरमधील अतिवृष्टीने या मृतवत नद्यांमध्ये प्राण फुंकले. सप्टेंबरमध्ये या नद्यांना आलेल्या महापुरात खरिपाचा हंगाम वाहून गेला. हिंगोली शहरातून वाहणार्‍या कयाधू नदीचा नालाच झाला आहे. चाळीस वर्षांपूर्वी कयाधूचे पात्र देखणे होते. आता कयाधूकडे बघवतही नाही. सांडपाणी, ड्रेनेजने या नदीची रयाच गेली आहे. अतिवृष्टीत कयाधूनेही उग्र रूप धारण केले होते.

धाराशिवमध्ये भोगावती नावाची नदी आहे हे किती जणांना माहिती आहे! अवघ्या काही किमीचे आयुष्य असलेली ही नदी जवळपास नष्टच झाली आहे. परंतु अतिवृष्टीने तिलाही जीवदान दिले. वाशिरा, बेनीतुरा, चांदणी, खेरी, बोरी, बाणगंगा, टाळकी, लिंबा, येळंबची, बामटी या विस्मरणात गेलेल्या नद्याही अतिवृष्टीने जगासमोर आणल्या.

लातूर जिल्हा मांजरा, तेरणा, तावरजाच्या पाण्यावर धष्टपुष्ट झाला. रेणा, लेंडी, मन्याड नद्यांनी येथील शेतजीवन समृद्ध केले. काळाच्या ओघात वाकी, घरणी, देव, मुरडा, कारंजा, मुदगळ, तिरू या नद्या विस्मृतीत गेल्या. पण अतिवृष्टीने या नद्या जिवंत झाल्या आणि आपले रौद्रभीषण रूप त्यांनी लातूरकरांना दाखवले.

जालना जिल्ह्यात कुंडलिका, दुधना या नद्या परिचयाच्या. प्रकल्पामुळे कल्याण नदीचीही बर्‍यापैकी ओळख. केळणा, गल्हाटीही नद्या ओळखीच्या. पार, मांगणी, घोळ, जीवरेखा, जुई, धामणा, मेह, राजाकुंडी… अतिवृष्टीत जिवंत झालेल्या या नद्यांनी शेतशिवारात धुमशान घातले. परभणी जिल्ह्यात मासळी, खळी या दोन्ही नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर होत्या. त्यांना अतिवृष्टीने जिवंत केले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी, शिवना या नद्यांनी आपापला काठ समृद्ध केला आहे. नारंगी, नारळी, सुकना या नद्या तशा अपरिचित. शहरातून वाहणारी खाम नदी फक्त नावानेच ओळखली जाते. पण या अतिवृष्टीने खाम नदी आपोआपच स्वच्छ झाली.

गोदावरी आणि मांजरा या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या नद्या. गोदावरीचा जन्म नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या डोंगररांगात, तर मांजरा नदी दुष्काळी बालाघाटच्या पर्वतराजीतील. कारवा, शिवना, दक्षिणपूर्णा, प्राणहिता, इंद्रावती, किकवी, आळंदी, देव, नारंगी, नारळी, आसना, सीता, दारणा, प्रवरा, सिंदफणा, मांजरा, कोळ, सुकना, ढोर, अमृता, सरस्वती, मासळी, कहाळ या गोदावरीच्या उपनद्या. देवणी, लेंडी, तिरू, मन्याड, बामटी, टाळकी, येळंबची, लिंबा, केज, तावरजा, तेरणा, गिरणा, घरणी या मांजराच्या उपनद्या. पावसाळ्यात यापैकी बहुतांश नद्यांमध्ये अर्धा फूट पाणी आले तरी नशीब. पण यंदा सप्टेंबरमध्ये या नद्यांचे महाभयानक रूप बघायला मिळाले.

मराठवाड्याचे शेतशिवार संपन्न होत असतानाच येथील बदलत्या हवामानाकडे मात्र कुणाचे लक्ष गेले नाही, किंबहुना त्याची कुणाला गरजच वाटली नाही. भूजलाचा उपसा करण्यासाठी जमिनीची चाळणी झाली. चार एकराच्या शेतात किती बोअर घ्याव्ोत यावर कुणाचे नियंत्रण राहिले नाही. केवळ हवामान बदलाला दोष देऊन चालणार नाही. राष्ट्रीय पूरनियंत्रण आयोग आज अस्तित्वात आहे का? असेल तर नक्की काय करत आहे? रस्ते बांधले म्हणजे विकास झाला अशी सध्या टूम निघाली आहे. रस्ते बांधताना पाण्याचा निचरा करण्याची सोय मात्र करण्यात येत नाही. धरण बांधले की संपले. नदी वाहताना माती का वाहून आणत आहे याचा विचार आपण कधी करणार आहोत? मृदसंधारण, नालाबंिंडग कुठे आहे? पूरनियंत्रण म्हणजे नदी सरळ करणे, खोल करणे असा एक समज निर्माण झाला आहे. नदीच्या नरड्याला जेव्हा जेसीबी, पोकलेन लागले तेव्हाच या संकटाची चाहूल लागली होती. वाळूचा बेसुमार उपसा आपण कधी थांबवणार आहोत? वाळू हा नैसर्गिक पूरप्रतिबंधक उपाय आहे हे सरकार, प्रशासनाच्या कधी लक्षात येणार आहे? मुळात माती आणि पाणी व्यवस्थापनच आपल्याकडे नाही आणि सरकारला त्याची गरजही वाटत नाही. – अतुल देऊळगावकर, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक