गॅसगळतीने अंबरनाथकर घुसमटले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

मोरिवली एमआयडीसीतून मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाल्याने संपूर्ण अंबरनाथवासीयांचा श्वास गुदमरला. शहरातील रस्त्यांवर सर्वत्र गॅस पसरल्याने पुढचे दिसणेही कठीण झाले. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना झाला असून वारंवार असे प्रकार घडत असल्याने लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोरिवली एमआयडीसीमध्ये गॅसगळती, आग लागणे, केमिकलची गळती असे प्रकार वारंवार होत आहेत. रासायनिक दुर्गंधीमुळे काही तास अंबरनाथवासीयांनी दारे, खिडक्या लावून स्वतःला कोंडून घेतले. दरम्यान गॅसगळतीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीमध्ये अनेक केमिकल कारखाने असून त्यात हजारोंच्या संख्येने कामगार काम करतात. अनेकदा सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्याने आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून केमिकल कंपनीतून अचानक गॅसगळती सुरू झाली आणि आजूबाजूचा परिसर गॅसने वेढला गेला. या गॅसला काहीसा उग्र दर्प येत असल्याने अनेकांना मळमळणे, डोळे चुरचुरणे, उलटी असा त्रास सुरू झाला. निसर्ग ग्रीन, मोरिवली पाडा, ग्रीन सिटी, बी केबिन, पाठारे पार्क, मोतीराम पार्क, बुवापाडा, लादीनाका यांसह संपूर्ण अंबरनाथ शहरात अक्षरशः श्वास घेणेही कठीण झाले होते.