नोकरदारांची दोन दिवस सागरी नाकाबंदी; उरणमध्ये 25 हजार अवजड वाहने अडकली, गेट वे ते मांडवा, एलिफंटा बोट वाहतूक बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांनी खास नियमावली तयार केली असून गेट वे ते मांडवा व एलिफंटा बोट वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदारांची दोन दिवस सागरी नाकाबंदी झाली असून उरणमध्ये २५ हजार अवजड वाहने अडकून पडली आहेत. वाहतूक विभागाने जाहीर केलेल्या नियमावलीची दोन दिवस काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक ३ च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या दौऱ्याकरिता राज्यस्तरीय तसेच केंद्राचीही सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. आज सकाळपासूनच जेएनपीए व उरण परिसरातील कंटेनर वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे उरण परिसरातील विविध रस्त्यांवर २२ हजार अवजड वाहने ठिकठिकाणच्या रस्त्यावर अडकून पडली असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी दिली.

  • जेएनपीए परिसरातही सुमारे तीन हजार अवजड वाहने विविध रस्त्यांवर पार्किंग करून ठेवली होती. जेएनपीटी वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी ही माहिती दिली.
  • सुमारे २५ हजार अवजड वाहने ठिकठिकाणच्या रस्त्यावर अडकून पडल्याने येथील बंदरातील कंटेनर वाहतुकीवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील दोन दिवसीय दौऱ्याच्या सुरक्षिततेसाठी मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथील जलवाहतुकीची नाकाबंदी करण्यात आली आहे.

लेखी आदेशानंतर अंमलबजावणी

गेट वे ऑफ इंडिया येथून गेट वे – एलिफंटा, गेट वे – मांडवा या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक उद्या ९ ऑक्टोबर रोजीही पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे. लेखी आदेशानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली असल्याचे गेट वे जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी इक्बाल मुकादम यांनी सांगितले.