नीलेश घायवळचं गुजरात कनेक्शन उघड; अहमदाबादमार्गे लंडनला पळाला, राम शिंदेंचं नाव घेत रोहित पवारांचा गंभीर आरोप

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन विदेशात फरार झाला आहे. त्यातच पुणे पोलिसांनी नकार दिलेला असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने नीलेश याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. याच प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. नीलेश घायवळ याचे गुजरात कनेक्शन समोर आले असून तो अहमदाबादमार्गे पळाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

गुरुवारी पत्रकार परिषदेदरम्यान रोहित पवार यांना नीलेश घायवळ याच्या भावाला बंदुकीचा परवाना देण्यात आल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, गुंड नीलेश घायवळ महाराष्ट्राचे आजचे सभापती राम शिंदे यांचा निकटवर्तीय आहे. राम शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना फोन केला असावा किंवा गृह विभागाच्या कार्यालयातून राज्यमंत्र्‍यांवर दबाव आला असावा आणि सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना दिला असावा.

ते पुढे म्हणाले की, आजही छोटे-मोठे व्यापारी एसपी, सीबी कार्यालयात जातात तेव्हा तिथे त्यांना पिस्तुल, बंदुकीचा परवाना दिला जात नाही. मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे बंदुकीचा परवाना मिळत असेल तर त्यात फार वरिष्ठ पातळवरील लोक सहभागी असतील. गृह विभाग, गृहमंत्री स्वत: किंवा राम शिंदेही यात सहभागी असू शकतात.

ज्या गोष्टी सामान्यांना सहज मिळू शकत नाही, जसे की पासपोर्ट, तो नीलेश घायवळ याला सहज मिळतो आणि तो देश सोडून जातो. नीलेश घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला गेला आणि त्याला काही नेत्यांनी मदत केली. राम शिंदे यांनीही त्याला मदत केल्याची लोकांमध्ये चर्चा आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

घायवळच्या भावाला योगेश कदम यांनी दिला शस्त्रपरवाना

गृहमंत्र्यांनी सदर प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करावी आणि जबाबदार असतील त्यांना पकडावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. गौतम पाटील गाडीत नसतानाही तिला उचलायची भाषा करता, मग या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वरदहस्त दिला? या माणसाला खोटा पासपोर्ट मिळतो, अनेक गुन्हे दाखल असतानाही हा मोठ्या लोकांच्या प्रचारात दिसतो. त्याच्या भावाला सहजपणे पिस्तुल परवाना दिला जातो. यावरून हे सामन्य लोकांचे नाही तर गुंडांचे, कॉन्ट्रॅक्टरचे सरकार असल्याचे सिद्ध होते, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.