
आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे दरवर्षी लाखो लोक चारधाम यात्रा करतात. 8 ऑक्टोबर रोजी उत्तराखंड आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 4 मे ते 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 47 लाख 29 हजार 555 भाविकांनी चारधाम यात्रा केली आहे. यंदा चारधाममधील केदारनाथ यात्रेने एका नव्या विक्रमाची नोंद केलीय. बुधवारपर्यंत केदारनाथला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 16.56 लाख झाली आहे. मंदिराचे कपाट बंद होण्यास अजून 14 दिवस उरले आहेत. त्यामुळे अजून भाविकांची संख्या किती लाखांनी वाढतेय, हे 23 ऑक्टोबरनंतर स्पष्ट होईल.
भाऊबीजेच्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबरला केदारनाथ मंदिराचे कपाट बंद केले जातील. बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांमध्येही यात्रेकरूंची संख्या वाढली आहे. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 2ः56 वाजता बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामासाठी बंद केले जातील. पुढील वर्षी 30 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे उघडून चारधाम यात्रेला सुरुवात झाली. 2 मे रोजी केदारनाथ मंदिर उघडण्यात आले आणि त्यानंतर 4 मे रोजी बद्रीनाथ मंदिर उघडण्यात आले. खराब हवामान आणि सततच्या पावसामुळे 1 ते 5 सप्टेंबरपर्यंत यात्रेकरूंची नोंदणी आणि चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली होती. खराब झालेल्या रस्त्यांमुळे, गंगोत्री आणि यमुनोत्रीच्या यात्रेला तात्पुरते स्थगिती देण्यात आली होती.
धाम | एकूण भाविक |
केदारनाथ | 16,50,925 |
बद्रीनाथ | 14,48,785 |
श्री हेमकुंड साहिब | 2,70,869 |
गंगोत्री | 7,23,853 |
यमुनोत्री | 6,25,397 |