उद्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा, उद्धव ठाकरे करणार नेतृत्व

अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार असून क्रांती चौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल.

सप्टेंबर महिन्यात संपूर्ण मराठवाडय़ावर आभाळ कोसळले. संततधार पावसामुळे घरादारांसह शेतशिवार वाहून गेले. नदीकाठावरील शेतजमिनी खरवडून गेल्या. सोयाबीन, मका, बाजरी, उडीद, कापसाचा शेतातच चिखल झाला. महापुराचा तडाखा एवढा जबरदस्त होता की मोसंबी, केळी, डाळिंब, आंब्याच्या बागा मुळासकट उखडल्या. अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आपल्या पाठीशी उभे राहील अशी अपेक्षा होती. परंतु फडणवीस सरकारने पॅकेजच्या नावाखाली कागदी घोडे नाचवले. अतिवृष्टी होऊन आता महिना उलटला पण शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली छदामही मिळालेला नाही. नुकसानीचे पंचनामेही झाले नाहीत आणि सरकार मात्र दिवाळीपर्यंत मदत मिळेल अशा बाजारगप्पा मारत आहे.

आपत्तीने उघडय़ावर आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना धावली आहे. शनिवार 11 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात विभागीय आयुक्तालयावर शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांती चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चाला प्रारंभ होणार असून या मोर्चात मराठवाडय़ाच्या आठही जिल्हय़ांतून हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. मोर्चाचा समारोप गुलमंडीवर होणार असून या मोर्चात शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी होणार आहेत.

मागण्या

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावे

हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या

पीक विम्याचे निकष पूर्ववत ठेवा

घरे व पशुधनासाठी निकष शिथिल करून मदत द्या