
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका ही समारोपाची मालिका असल्याच्या अफवांना गेले काही दिवस उधाण आले असताना कर्णधार शुभमन गिलने हे दोघेही 2027च्या वर्ल्ड कपपर्यंत संघाचा अविभाज्य घटक असतील, असे स्पष्ट केले आणि या अफवा आणि चर्चांवर पूर्णविराम लावला.
रोहित आणि विराट यांनी टी-20नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र वन डे क्रिकेट खेळणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी रोहित शर्माचे वन डेतील कर्णधारपद काढून घेतल्यानंतर या दोघांची कारकीर्द मावळतीकडे झुकल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच गावसकरांपासून मोहम्मद कैफसारख्या अनेकांनी दोघांना वन डे क्रिकेट खेळत राहण्यासाठी अनेक सल्ले दिले आहेत. पण आता गिलने दोघेही आणखी दोन वर्षे हिंदुस्थानचे आधारस्तंभ म्हणून कायम असतील, असे स्पष्ट केले.
रोहित शर्मा आपले प्रेरणास्थान आहे. त्याच्याकडून आपण खूप काही शिकलोय आणि शिकतोय. त्याची शांत वृत्ती, संघात निर्माण केलेले आपुलकीचे वातावरण आणि खेळाडूंमध्ये असलेलं बंधुत्व – हे सगळं मला प्रेरणा देतं. हेच गुण मी माझ्या नेतृत्वात उतरवू इच्छित असल्याचे गिल म्हणाला. रोहित आणि विराटचं योगदान केवळ मैदानावरच नव्हे तर मोठय़ा स्पर्धांमध्ये विशेषतः विश्व चषकासारख्या क्षणी संघाच्या मानसिकतेसाठी आणि लढाऊ वृत्ती टिकवण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.