
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात ११ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतरही हजारो युवकांच्या हाताला अद्याप काम मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेले २५ हजार बेरोजगार ‘चला एकनाथ मामांच्या गावाला’ असे सांगत रविवार १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या ठाण्यातील घरावर मोर्चा काढणार आहेत. त्याच ठिकाणी आम्ही काळी दिवाळी साजरी करणार असल्याची घोषणाही आज बेरोजगारांच्या संघटनेने पत्रकार परिषदेत केली आहे.
राज्यात पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजने पाठोपाठ युवावर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राबवली. तसेच १० लाख युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रतिमाह ६ हजार व १० हजार मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनांमध्ये काम केलेले तब्बल १ लाख ७५ हजार प्रशिक्षणार्थी आजघडीला प्रशिक्षित बेरोजगार बनले आहेत. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले असून एकनाथ मामाने एकप्रकारे आपल्या भाचा-भाचींना फसवल्याचा आरोप युवकांनी आज ठाण्यातील पत्रकार परिषदेत केला.
या आहेत मागण्या
- या बेरोजगार प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रोजगार देऊन मानधनात दुप्पट वाढ करावी.
- रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा आगामी नागपूर अधिवेशनात करावा.
“राज्यातील महायुती सरकारने युव युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या विरोधात राज्यभरात आजवर १३ आंदोलने करण्यात आली, तरीही सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आक्रमक झाली आहे. येत्या १२ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.”
– बालाजी पाटील-चाकुरकर (संघटना प्रदेश कार्याध्यक्ष)