
मुरबेच्या भांडारआळी गावात राहणारा पारस चुरी हा वीस वर्षीय तरुण गुगलचा सॉफ्टवेअर इंजिनीयर बनला आहे. पारसने सीईटी परीक्षेत ९९ टक्के गुण प्राप्त करत वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये कम्प्युटर इंजिनीयरसाठी प्रवेश मिळवला. त्याच्या या जिद्द, चिकाटीला गुगलने हेरले आणि त्याची सॉफ्टवेअर इंजिनीयरसाठी निवड केली.
पारसचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तारापूर विद्या मंदिरात झाले. दहावीला त्याने ९३ टक्के तर बारावीत ९२ टक्के गुण मिळवले. इंजिनीयरिंगचे शिक्षण घेण्यासाठी त्याने सीईटी परीक्षेतही अव्वल क्रमांक पटकावत यश गाठले. सध्या तो तृतीय वर्षात असून पुढील वर्षी नोकरीसाठी बंगळूरूला जाणार आहे.
इयत्ता सातवीत असताना पारसचे वडील आणि शिवसैनिक कांचन चुरी यांचे कर्करोगाने निधन झाले होते. त्यानंतर त्याची आई तृप्तीने शिलाईकाम करून त्याचा सांभाळ केला. मात्र लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या पारसने संघर्षावर मात करत जिद्द आणि चिकाटीने आपल्या स्वप्नांना गवसणी घातल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याने पालघरचे नाव उंचावले असून ही अभिमानास्पद बाब असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुकाप्रमुख जयमाला चुरी यांनी सांगितले.