समाजभान – जेन ‘झी’चे मानसिक आरोग्य

>> नीलय वैद्य, [email protected]

जोश, उन्माद या भावनांबरोबर जग जिंकण्याची आकांशा उरी बाळगून विशिष्ट आटिटय़ूडमध्ये जगणारी जेन झी ही पिढी. त्यांच्यावर समाजमाध्यमांचं अनाकलनीय असं गारुड आहे. आजूबाजूच्या घटनांमधून जेन झीची मानसिकता स्पष्ट होताना ती सकारात्मक दिशेने चालली आहे का, हा प्रश्न पडतोच.

पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष दिना बोलुआर्ते यांच्याविरुद्ध तिकडच्या जेन झीने पुकारलेलं युद्ध आपण पाहिलं आणि त्याची तीव्रताही अभ्यासली. जेन झी म्हणजे 1997 नंतर आणि 2012 पूर्वी जन्मलेली पिढी. वय वर्षे 13 ते 28 या वयोगटातला जोश, उन्माद या भावनांबरोबर जग जिंकण्याची आकांशा उरी बाळगून विशिष्ट ‘आटिटय़ूड’मध्ये जगणारी मंडळी. त्यांच्यावर समाज माध्यमांचं अनाकलनीय असं गारुड आहे. नेपाळमध्ये याच जेन झीने राजकीय उथलपुथल घडवली. त्यामुळे जगाचं लक्ष आकर्षित करण्यात त्यांना यश मिळालं. रील्स, शॉट्सच्या माध्यमातून त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. यात जेन झीची मानसिकता स्पष्ट झाली. ती सकारात्मक दिशेने चालली आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला.

10 ऑक्टोबर हा ‘जागतिक आरोग्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो. म्हणून जेन झीची मानसिक जडणघडण हा मुद्दा ऐरणीवर आला. जगातले तमाम विचारवंत, इन्फ्लुएन्सर हैराण झाले. एकीकडे आक्रमकता, हिंसा, जग कवेत घेण्याची ईर्षा त्यासाठी समाज माध्यमांना हाताशी धरून वाटेल ते करण्याची ताकद, तर दुसरीकडे मनाची घालमेल, करीअरचं दडपण, घरच्यांच्या अपेक्षांचा महामेरू आणि तारुण्यातील नातेसंबंधांची गुंतागुंत त्यातून येणारं नैराश्य, चिंता, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर, पीटीएसडी अशी जेन झीची मानसिक स्थिती आहे. याविषयी बोलताना प्रोअॅक्ट माइंडचे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. अनुपम सांगतात, “जेन झीची म्हणजेच तरुण पिढीची मानसिक स्थिती अति संवेदनशील आहे. ती स्वच्छ पाण्यासारखी आहे. त्यात जो रंग मिसळाल, त्या रंगाचं पाणी होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ते विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग-व्यवसाय, राजकारण, समाजकारण, क्रीडा, क्रिकेट या नानाविध क्षेत्रांत अटकेपार झेंडा फडकवत आहेत, तर दुसरीकडे हीच मंडळी आतंकवाद, हिंसा, अमली पदार्थ, सायबर क्राईम, सेक्स स्कॅण्डल, खूनखराबा यांच्या अधीन जात आहेत. जेन झीला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर ही परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. त्यांचा वेग आपल्या आवाक्याबाहेरचा आहे.”

जागतिक पातळीवर जेन झी कोणत्या बऱयावाईट कृत्यांमध्ये व्यस्त आहे हे आपण पाहिलं, पण डॉ. अनुपम यांना मनोविकार तज्ञ म्हणून अनेक जेन झीसंबंधीच्या समस्या हाताळाव्या लागतात. त्यांच्याकडे मनोरुग्ण म्हणून येणाऱया जेन झीची संख्या दिवसांगणिक वाढत आहे. याविषयी सविस्तर सांगताना डॉ. अनुपम यांनी प्रणालीची केस सांगितली. संध्याकाळची वेळ होती. प्रणाली तिच्या आईबाबांबरोबर माझ्या वडाळा क्लिनिकला आली. ती वीस, बाविशीतली असेल. प्रणाली फेसबुक, इन्स्टाच्या पूर्ण आहारी गेली होती. त्याची पालकांना चिंता सतावत होती, पण मुख्य कारण होतं प्रणालीचं अफेअर. क्षितिजबरोबर तिचं ऑनलाइन सूत जमलं होतं. दोघं बऱयापैकी पुढे गेले होते. नाईट ओव्हर भेटीगाठी सुरू होत्या. आईने प्रणालीच्या नकळत तिचा मोबाइल तपासला आणि यावरून घरात भांडण झालं. प्रणालीचं म्हणणं होतं, “मी असा काय गुन्हा केलाय… आईबाबा का आकाशपाताळ एक करतायत? पूर्वीची पिढी प्रेमपत्र लिहायची. आमची पिढी समाज माध्यमातून व्यक्त होते. यात आमचं काय चुकलं? समाजात आता खूप मोकळेपणा आलाय. आईबाबांना जे अयोग्य वाटते ते आमच्या पिढीला नॉर्मल वाटते.’ डॉक्टर या नात्याने मी ही केस हाताळताना समुपदेशनाचा मार्ग अवलंबला. सर्वप्रथम तिघांना सांगितलं, “भांडून हा तिढा सुटणार नाही. सगळ्यांनी शांत राहणं महत्त्वाचं आहे.” मग तिच्या पालकांना फेसबुक, इन्स्टा या माध्यमांचा जुजबी अभ्यास करायला सांगितलं. कारण हा विषय त्यांच्यासाठी नवा होता. हळूहळू त्यांना माध्यमाचं महत्त्व कळलं. प्रणालीलाही आईबाबांची चिंता समजली. तिघांमध्ये सुसंवाद सुरू झाला.

आणखी एक केस नातेसंबंधातील गुंतागुंतीची. अंजू आणि समीर सीनियर कॉलेजला होते. त्यांचा मोठा ग्रुप होता. सगळ्यांची धमाल मस्ती चालायची. पुढे अंजू आणि समीरची मैत्री सखोल झाली. दोघं रिलेशनशिपमध्ये आले. थोडे दिवस बरे गेले. नंतर अंजू समीरवर हक्क दाखवू लागली. हळूहळू तिचा हट्ट वाढत गेला. समीर समंजस होता, पण अंजूच्या स्वभावाला तोही कंटाळला. त्याला त्रास होऊ लागला. अंजू – समीरमध्ये दुरावा वाढू लागला. अंजू डिप्रेशनच्या आहारी गेली. तिने ग्रुप सोडला. ती एकटी एकटी राहू लागली. समीर समजदार होता. तो तिला घेऊन डॉ अनुपम यांच्याकडे आला. दोघांचं समुपदेशन सुरू झालं तेव्हा कळलं, अंजूची लक्षणं डिप्रेशनची आहेत. त्यावर डॉक्टरांनी गोळ्या सुरू केल्या. दोन महिन्यात अंजूची गाडी रुळावर आली. तिचं डिप्रेशन कमी झालं. ती बरी झाली. आता अंजू आणि समीर गुण्यागोविंदानं रिलेशनमध्ये आहेत. त्यांची समस्या सुटली. कारण ते एकमेकांची मोकळेपणाने बोलले. यात सुसंवाद महत्त्वाचा!

अशा कितीतरी केसेस डॉ. अनुपम यांनी कौशल्याने हाताळल्या आहेत. रोहन हा जेन झीचं उत्तम उदाहरण आहे. कॉलेजात असताना त्याचे वडील वारले. तो त्यांच्या खूप जवळ होता. आईचा मात्र तो राग करायचा. त्याचा राग परकोटीचा होता. वेळप्रसंगी तो आईला मारायचादेखील. मेथ, वीड, कोकेन, एमडी यांचं त्याला आकर्षण होतं. रोहन बॉक्सिंग खेळायचा. त्यामुळे त्याच्यात रग होती, पण अमली पदार्थांच्या नादी लागून तो खालावला. त्याचा आक्रमकपणा पाहून डॉ. अनुपम यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. औषधोपचारांमुळे तो पन्नास टक्के सुधारला. नोकरीवर जाऊ लागला. नशा हीसुद्धा जेन झीची विदारक समस्या आहे. दारू, सिगारेट वाईट, पण आमली पदार्थांची चटक म्हणजे महाभयंकर. ती सहसासहजी सुटत नाही. म्हणूनच घरामध्ये सुसंवाद हवा. पालकांनी जेन झीला काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. त्यांच्या भावी आयुष्याला सकारात्मक दिशादर्शन मिळणं आवश्यक आहे. जेन झीनेही शहाणपण दाखवलं पाहिजे. थोडक्यात काय, प्रत्येकाने आपापली सुखदुःखं जवळच्यांना सांगायला हवीत. मोकळं होणं महत्त्वाचं. अन्यथा परिस्थिती अवघड आहे. दोन शब्दांत सांगायचं झालं तर  ‘बोलाल तर वाचाल’ हेच खरं!