
>>रितेश पोपळघट, [email protected]
तेलंगणा राज्यातील मुलकानूर सहकारी ग्रामीण पतपुरवठा व विपणन सोसायटी ग्रामीण विकासाचं एक जिवंत प्रतीक आहे. मुलकानूर ही केवळ एक सोसायटी नसून संपूर्ण परिसरातील शेतकऱयांची जीवनदायिनी बनली आहे. ग्रामीण भारताच्या आशा, एकता आणि प्रगतीचं प्रतीक म्हणजे सहकार आणि मुलकानूरचा प्रयोग हा यशस्वी दिशादर्शक ठरतो.
सहकार क्षेत्र म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या पतसंस्था, साखर कारखाने, राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक घोटाळ्यांच्या कहाण्या. खरं तर सहकाराची मूळ तत्त्वं आणि उद्दिष्टं आपण कुठेतरी विसरून बसलो आहोत ही खंत नेहमीच जाणवते. 1904 पासून सुरू झालेल्या सहकाराच्या प्रवासाची व्याप्ती मोठी असली तरी त्याची खरी क्षमता आजही पुरेपूर वापरली गेलेली नाही. ग्रामीण भागातील सामाजिक-आर्थिक विषमता, शेतकऱयांच्या समस्या, बेरोजगारी आणि महागाई या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सहकाराची ताकद वापरता आली असती; पण योग्य दिशेअभावी या समस्या अधिकच तीव्र होत गेल्या.
अशा पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी मला तेलंगणा राज्यातील मुलकानूर सहकारी ग्रामीण पतपुरवठा व विपणन सोसायटीला भेट देण्याची संधी मिळाली. ही संस्था केवळ एक पतपुरवठा संस्था किंवा सोसायटी नाही, तर ग्रामीण विकासाचं एक जिवंत प्रतीक आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. 1956 मध्ये 14 गावांतील 375 सदस्यांसह सुरू झालेली ही सोसायटी आज 7,641 सदस्यांची मजबूत प्रभावी संघटन असलेली संस्था आहे. विशेष म्हणजे आज चौथ्या पिढीतील शेतकरीदेखील या सहकारात शाश्वत प्रक्रियेत सक्रिय आहेत. त्यामुळेच हे स्पष्ट झालं की, जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा ते फक्त लाभार्थी न राहता बदलाचे आधारस्तंभ आणि वारसदार ठरतात.
मुलकानूर सोसायटीच्या यशाचं गमक तिच्या एकात्मिक दृष्टिकोनात आहे. सुरुवातीला शेतकऱयांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणे, सावकारांच्या जाळ्यातून मुक्तता करणे आणि पीक उत्पादन वाढवणे हा उद्देश होता, पण आज ही संस्था केवळ पीक कर्जापुरती मर्यादित नसून कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, रेशीमपालन अशा विविध कृषीसंबंधित उपक्रमांसाठीही आर्थिक मदत पुरवते. कर्ज केवळ रोखीनेच नाही, तर वस्तुरूपानेही दिलं जातं. तसेच ट्रक्टर व शेतीची अवजारे भाडय़ाने देण्याची सुविधा असल्याने शेतकऱयांना वेळेवर आणि योग्य दरात साधनं मिळतात.
संस्थेकडे स्वतचं तांदूळ प्रक्रिया केंद्र, कापूस जीनिंग युनिट आणि बियाणे प्रक्रिया केंद्र आहे. त्यामुळे केवळ कच्चा माल विकण्याऐवजी मूल्यवर्धित उत्पादन तयार करून अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱयांना मिळते. मोठय़ा प्रमाणावर खरेदी-विक्रीमुळे आवश्यक वस्तू सदस्यांना स्वस्त दरात मिळतात. शेतकऱयांसाठी स्वतंत्र माहिती केंद्र आणि प्रशिक्षण केंद्रही येथे कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व शेतीविषयक नवनवीन माहिती शेतकऱयांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथं सातत्याने चालतं. संपूर्ण कामकाज संगणकीकृत प्रणालीद्वारे पारदर्शक व वेगवान पद्धतीने होतं.
शेतकऱयांच्या उत्पन्न वाढीसोबत विपणन जोडणी महत्त्वाची आहे हे ओळखून मुलकानूर सोसायटीने स्वतचा ‘मुलकानूर’ या नावाने तांदळाचा ब्रँड विकसित केला. भात लागवडीसाठी आवश्यक बी-बियाणं, निविष्ठा आणि तांत्रिक मार्गदर्शन सदस्यांना दिलं जातं. नंतर त्यांच्या उत्पादनाची खरेदी करून, साठवणूक व प्रक्रिया करून तो तांदूळ बाजारात विकला जातो. त्यामुळे शेतकऱयांचा वेळ, खर्च आणि बाजारातील दलालांचा त्रास वाचतो, तसेच त्यांना बाजारभावापेक्षा अधिकचा दर मिळतो.
मुलकानूर सोसायटीने महिलांसाठी स्वतंत्र संधी निर्माण केल्या. महिलांना कर्जपुरवठा करून देशातील पहिली यशस्वी महिला सहकारी दूध सोसायटी उभारण्यात आली, ज्यात आज 80 टक्क्यांपेक्षा जास्त महिला कार्यरत आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रक्रिया करून ते राज्यभर बाजारात पोहोचवले जातात आणि यामधून महिलांची आर्थिक उन्नती साधली जात आहे.
सोसायटीकडून शेतकरी वर्गासाठी सहकारी तत्त्वावरील पेट्रोल आणि घरगुती एलपीजीचादेखील पुरवठा केला जातो. याशिवाय अनेक कल्याणकारी उपक्रम राबवले जातात, जसे कुटुंब नियोजन शिबिरे, नेत्र तपासणी शिबिरे, पशुवैद्यकीय सेवा यांचा त्यात समावेश आहे. मृत सभासदांच्या कुटुंबांना अंत्यसंस्कारासाठी मदत केली जाते.
अपघात विमा व पीक कर्ज विमा अशा योजनांद्वारे सदस्य कुटुंबांना आर्थिक सुरक्षा पुरवली जाते. हे सर्व उपक्रम संस्थेच्या राखीव निधीतून चालवले जातात, जो मूल्यवर्धित उद्योगातून उभारला गेला आहे.
मुलकानूर सहकार चळवळीने दाखवून दिलं आहे की, ग्रामीण भारताचा विकास केवळ अनुदानावर किंवा कर्जमाफीवर शक्य नाही. शेतीवर आधारित उद्योगधंदे सामूहिक प्रयत्नांनी उभे केले तर ते अधिक कार्यक्षम ठरतात. याच कारणामुळे या भागात एकही शेतकरी आत्महत्या करत नाही आणि शेतकऱयांचं उत्पन्न सातत्याने वाढत आहे. या आदर्श कामगिरीबद्दल संस्थेला राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मुलकानूर ही केवळ एक सोसायटी नसून संपूर्ण परिसरातील शेतकऱयांची जीवनदायिनी बनली आहे. ग्रामीण भारताच्या आशा, एकता आणि प्रगतीचं प्रतीक म्हणजे सहकार आणि मुलकानूरचा प्रयोग हा यशस्वी दिशादर्शक ठरतो. आज प्राथमिक कृषी पतपुरवठा सोसायटय़ांना बहुउद्देशीय करण्याची गरज अधोरेखित होत असताना मुलकानूर मॉडेल हे आदर्श उदाहरण ठरतं आहे.





























































