उत्तर प्रदेश हादरलं; बहिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक

सामूहिक बलात्काराच्या घटनेने उत्तर प्रदेश हादरले आहे. लखनऊच्या बंथरा भागामध्ये पाच नराधमांनी अकारवीत शिकणाऱ्या 17 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केला. सदर मुलगी बहिणीला भेटण्यासाठी दुपारी 12 च्या सुमारास घराबाहेर पडली होती. याचवेळी नराधमांनी डाव साधला आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित मुलगी दुपारी 12 च्या सुमारास मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडली होती. ओळखीच्याच एक तरुण तिला दुचाकीवरून बहिणीके सोडायला निघाला होता. दुपारची वेळ असल्याने दोघे पेट्रोल पंपाजवळील एका आंब्याच्या बागेजवळ सावलीत थांबले होते. याचवेळी पाच आरोपी तिथे आले आणि त्यांनी मुलीसोबतच्या व्यक्तीला मारहाण केली. त्यामुळे तो तिथून पळून गेला. यानंतर नराधमांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त विकास कुमार पांडे यांनी दिली.

अत्याचार झाल्याची बाब कुणाला सांगितली तर ठार मारू अशी धमकी देत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यामुळे भेदरलेल्या मुलीने मेहुण्याला फोन करून आपबिती सांगितली. त्यानंतर पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपींचा शोध सुरू केला.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली. अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. त्याच रात्री उशिरा काही संशयित बंथरा येथील रेल्वे स्थानका जवळ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. यावेळी दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात एका संशयिताच्या पायाला गोळी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जखमी आरोपीचे नाव ललित कश्यप असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी दिली. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्तुल जप्त केले आहे. सदर गुन्ह्यातील आणखी एक आरोपी दुचाकीवरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.