Cheers!! “संभाजीनगरचे ‘शशी थरूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…”, भुमरेंच्या संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंचा खोचक टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांचा खरपूर समाचार घेतला आहे. संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवे यांनी भुमरेंची फिरकी घेत त्यांना संभाजीनगरचे ‘शशी थरूर’ असे म्हटले. रविवारी दुपारी दानवे यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

अंबादास दानवे यांनी एक्स पोस्टवर म्हटले की, सर्वप्रथम पैठण तालुक्यातील पाचोड गावचे खासदार संदिपान भुमरे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन! संभाजीनगरचे शशी थरूर म्हणून ओळखले जाणारे खासदार साहेब यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न महिला, कामगार, रस्ते, आरोग्य आणि एकंदरीत गरीब-गरजू लोकांचे आवाज बनत सत्ताधाऱ्यांना आपल्या भाषणाने घाम फोडत आवाज नेहमीच उठवत संभाजीनगरच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे.

संपूर्ण संसद आपल्या भाषणाने हलवून सोडणारे संदिपान भुमरे साहेब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा तर त्यांचा ज्ञानाचा आवाक्याबाहेरचा विषय नाही! असो, Cheers!! असेही दानवे यांनी म्हटले. तसेच हा पुरस्कार ठरवणारे नेमके सज्जन कोण आहेत, हे जाणून घेण्याची मला जिज्ञासा आहे, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी हंबरडा मोर्चावर टीका करणाऱ्या भुमरे यांचा अंबादास दानवे यांनी समाचार घेतला होता. उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करताना संदीपान भुमरे यांनी हे ध्यानी घ्यावं की ध्यानीमनी नसताना आपल्याला कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देणारे उद्धव साहेब ठाकरे हेच होते. कोविडचे बलशाली संकट राज्यावर असताना उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडून आपल्या रोजगार हमी खात्याचा रुपयाही निधी कपात करण्यात आला नव्हता. २०१९ पर्यंत आपण जो निवडणूक उमेदवारी अर्ज भरून आमदार झालात, त्या फॉर्मवर उद्धव ठाकरे साहेबांचीच सही होती. आपले सुपुत्र जिल्हापरिषद सदस्य, सभापती झाले ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याच पक्षाकडून झाले होते. आपला स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट हा प्रवास सर्वश्रुत आहे. कशाला अधिक बोलायला लावता? दानत आणि हिम्मत असेल तर सरकारला कर्जमुक्ती देण्यासाठी आपण भाग पाडाल! जे तुमच्या आवाक्याबाहेर आहे, अशी टीका दानवे यांनी केली होती.