क्लबमध्ये फ्लेम शो दरम्यान भीषण आग, दोन बारटेंडर गंभीर भाजले

उत्तराखंडमधील देहरादून येथील एका स्थानिक क्लबमध्ये फ्लेम शो दरम्यान भीषण आग लागल्याने दोन बारटेंडर जखमी झाले. क्लबमधील अन्य लोक थोडक्यात बचावले. याप्रकरणी पोलिसांनी बार व्यवस्थापनाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. बेकायदेशीर आणि जीवघेण्या स्टंटसाठी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

देहरादूनमधील राजपूर रोड येथील सर्कल क्लबमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. बारटेंडर अल्कोहोल आणि इतर ज्वलनशील पदार्थांचा वापर करून ‘फ्लेम शो’ करत होते. यावेळी अचानक ठिणग्या भडकल्या आणि क्लबमध्ये मोठी आग लागली. ज्वलंत स्टंट करणाऱ्या दोन बारटेंडरचे चेहरे जळाले आणि अनेक जण भाजले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.