
क्रिकेट सामन्यात शेवटचा चेंडू टाकताच गोलंदाज जमिनीवर कोसळला. सहकाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. क्रिकेटच्या मैदानातच गोलंदाजाने अखेरचा श्वास घेतला होता. अहमर खान असे मयत गोलंदाजाचे नाव आहे. अहमरच्या संघाने हा सामना जिंकला. मात्र सामना जिंकल्याचा आनंद शोकात बदलला. अहमरच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील बिलारी ब्लॉकमध्ये एका क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात मुरादाबाद आणि संभल संघ सहभागी झाले होते. अहमर खान मुरादाबाद संघातून खेळत होता. अहमरने शानदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र शेवटचा चेंडू टाकताच अहमर खाली कोसळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला सीपीआर देत तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे क्रिकेटच्या मैदानावर शोककळा पसरली.