
लिव्ह इन रिलेशनशीप राहणाऱ्या जोडप्याचे दारुवरून भांडण झाले. या भांडणातून महिलेने घराच्या आवारातील 80 फूट खोल विहिरीत उडी घेतली. विहिरीत उडी घेतलेल्या महिलेला वाचवताना अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यासह महिला आणि तिच्या प्रियकराचाही मृत्यू झाला. सोनी एस. कुमार, अर्चना आणि शिवकृष्णन अशी मृतांची नावे आहेत. अग्नीशमन दलाने तिघांनाही विहिरीतून बाहेर काढत रुग्णालयात नेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
केरळमधील कोल्लम येथे रविवारी रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अर्चना परिचारिकेचे काम करत होती. अर्चना आणि शिवकृष्णनचे प्रेमसंबंध होते. गेल्या दोन महिन्यांपासून दोघे एकत्र राहत होते. रविवारी रात्री शिवकृष्णनने दारुच्या नशेत घरी गोंधळ घातला. हा वाद वाढत गेला आणि त्यातूनच त्याने अर्चनावर हल्ला केला. वादातून अर्चनाने अंगणातील विहिरीत उडी घेतली.
अर्चना विहिरीत उडी घेतल्यानंतर घाबरलेल्या शिवकृष्णनने अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्नीशमन दलाने तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी कोट्टारक्कारा अग्नीशमन आणि बचाव युनिटमधील अग्नीशमन दलाचे कर्मचारी सोनी एस. कुमार अर्चनाला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच विहिरीचा कठडा कोसळला आणि दोघेही विहिरीत पडले. यादरम्यान आधारासाठी कठड्याला टेकून उभा असलेला शिवकृष्णनही कठडा कोसळल्याने विहिरीत पडला. अग्नीशमन दलाने बचावकार्य सुरू केले आणि तिघांनाही विहिरीतून बाहेर काढत रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.