अवकाळी पावसाने चिपळूणला झोडपले, बाजारपेठ आणि शेती दोन्ही संकटात

दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाच बुधवारी सायंकाळी चिपळूणमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाने शहरात धुमाकूळ घातला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील बाजारपेठ सजली होती. फटाके, आकाशकंदील, पणत्या, फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तूंचे स्टॉल्स उभे राहिले होते. मात्र या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. पावसाच्या पाण्यामुळे अनेक स्टॉलधारकांचा माल भिजला, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

शेती क्षेत्रातही या पावसाचा फटका बसला आहे. परिसरातील भातपीक आता कापणीसाठी सज्ज असतानाच झालेल्या पावसामुळे पिके आडवी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही शेतांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने चिंता वाढली आहे.सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. हवामान खात्याने पुढील २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.