देशातील लाखो शिक्षक टीईटी प्रश्नासंदर्भात दिल्लीत धडकणार

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या ऑनलाईन सभेमध्ये देशभारतील विविध राज्याच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये टीईटी सर्वोच्च न्यायालय निर्णय व जुनी पेन्शन या दोन विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती या दोन्ही प्रश्नांसाठी 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी दिली.

दिलीप देवळेकर यांनी सांगितले की,1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने देशातील जवळजवळ 15 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. तसेच या निर्णयाने शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार आहेत. या परिणामांचा विचार करता या प्रश्नांसाठी भारत सरकारने न्यायालयामध्ये शिक्षण व्यवस्थेची सकारात्मक बाजू मांडावी याकरिता आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याविषयी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी वेळी सरकारने आपली भूमिका सकारात्मकपणे बाजू घ्यावी याकरिता आंदोलनाचे आयोजन 24 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर करण्यात आले आहे. या आंदोलनाला देशभरातील जवळजवळ दहा लाखांपेक्षा जास्त शिक्षक उपस्थित राहतील असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या आंदोलनानंतरही प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने याविषयी दुर्लक्ष केल्यास संसदेच्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये देशभरातील लाखो शिक्षक संसदेला घेराव घालून जेलभारो आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिलीप देवळेकर यांनी दिली.