
‘कालनिर्णय’ आयोजित ‘पाकनिर्णय स्पर्धा 2026’चा भव्य पारितोषिक वितरण सोहळा येत्या शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा (पश्चिम) येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात पाककला, संगीत आणि स्नेहाचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या ‘कालनिर्णय पाकनिर्णय 2025’ या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात येणार आहे. तसेच या सोहळ्यात ‘कालनिर्णय सांस्पृतिक दिवाळी 2025’ या विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. या पाककला स्पर्धेचे परीक्षक म्हणून मोहसिना मुकादम, शेफ अनिश देशमुख आणि आशालता पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध लेखक आणि कवी नितीन रिंढे असतील. या विशेष प्रसंगी जीवनगाणी निर्मित ‘आठवणीतील गाणी’ या शीर्षकाखाली एक सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कालनिर्णयचे संस्थापक, प्रकाशक आणि संपादक जयराज साळगावकर यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.