
निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांना प्रल्हाद कुमार चौहान अपहरणप्रकरणात जामीन दिला. अपहरण झालेल्या पीडित व्यक्तीला 4 लाख रुपये तसेच पोलीस वेल्फेअर फंडाकडे 1 लाख रुपये जमा करा असे आदेश खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या एकलपीठाने दिले.
13 सप्टेंबर रोजी मुलुंड ऐरोली मार्गांवर सिमेंट मिक्सर गाडी आणि एका कारचा किरकोळ अपघात झाला. कारचालक प्रफुल्ल साळुंखे आणि खेडकर यांना अपघातप्रकरणी नुकसानभरपाई दिली नाही म्हणून मिक्सर चालक प्रल्हाद चौहान याचे अपहरण करून औंध येथील बंगल्यात कोंडून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक टाळण्यासाठी खेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टात दाखल केला. या अर्जावर आज न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी, अॅड. अभिषेक येंडे, अॅड. हेनिके व्यास व अॅड. शुभम काहिटे यांनी तर सरकारच्या वतीने अॅड. रंजना हुंबने यांनी युक्तिवाद केला.