रामभक्त तपस्वी शबरी

>> प्रा. शरयू जाखडी

तपस्वी शबरीच्या प्राणिमात्रविषयक करुणेतून भावभक्तीची अद्भुत कहाणी जन्माला आली. शबरी ही आदिवासी भिल्ल समाजातील भिल्लाच्या प्रमुखाची लाडात वाढलेली मुलगी होती. शबरीचे लग्न ठरताच ती घरातून पळून गेली. ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी पंपासरोवर परिसरात मातंग ऋषींचा आश्रम होता. तिथे तिने आश्रय घेतला. तेथे मातंग ऋषींच्या मार्गदर्शनाखाली तप, ध्यान यांचा अभ्यास केला. भूतलावर रामजन्म झाला आहे व तो दंडकारण्यात येत असल्याचे वृत्त आश्रमात आल्याने तिला रामभेटीचा निजध्यास लागला. इकडे मातंग ऋषींनी इहलोकयात्रा संपवायचे ठरवले. त्यांनी शबरीला वैकुंठ भवनात चलण्यासाठी आग्रह केला. तथापि वृद्ध काया झालेल्या तपस्वी शबरीने `माझ्या रामाला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मी हे वन सोडणार नाही’ असे नम्रपणे सांगितले. रामासाठी ती रोज बोरे चाखून मधुर असतील ती बाजूला काढून ठेवत होती. भक्तवत्सल रामालाही त्याच्या भक्ताच्या हृदयाची हाक ऐकू येत होती. राम, लक्षण शबरीच्या आश्रमात आले. तिने अश्रूंचा अभिषेक करीत रामचरण धुतले. तिची युगानुयुगांची प्रतीक्षा संपली. तिने जतन केलेली उष्टी मधुर बोरे रामाला अर्पण केली. रामाने ती मोठय़ा आनंदाने खाल्ली. ही रामभेट शबरीला अक्षय चिरंतनाचे साम्राज्य देऊन गेली.