संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘ई-बग्गी’मधून करा सफर, आदिवासी महिला करणार सारथ्य

निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता पर्यटकांच्या सेवेसाठी ई-कार्ट (ई-बग्गी) ची सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे ध्वनी व वायू प्रदूषण होणार नसल्याने उद्यानातील नैसर्गिक वातावरण अबाधित राखण्यासाठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे या ‘ई-बग्गी’चे सारथ्य येथील आदिवासी पाडय़ात राहणाऱया महिलांकडे देण्यात येणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोठय़ा संख्येने पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे पर्यटकांना प्रवास करणे सोयीचे व्हावे, शिवाय वाहनांमुळे पर्यावरणावर परिणाम होऊ नये याकरिता उद्यानात सायकल सेवा, ई-बसेसची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आता त्या जोडीला ई- बग्गीची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-बग्गीमुळे निसर्गाचा आनंद घेत प्रवास करणे सोयीचे होणार असून पर्यावरणाला कुठलाही धक्का बसणार नाही. शिवाय या ई-बग्गीचे सारथ्य तेथेच राहणाऱया महिलांकडे देण्यात येणार आहे. परिणामी त्या महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ई-बग्गी सेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला. यावेळी अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. श्रीनिवासा राव आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.