
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सलामीवीर खेळाडू स्मृती मानधना हिचे लग्न ठरल्याचे वृत्त आहे. आपल्या खेळाने आणि सौंदर्याने लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली मराठमोठी स्मृती इंदूरची सून होणार आहे. संगीत दिग्दर्शक, चित्रपट निर्माता पलाश मुछाल याच्यासोबत स्मृती लग्न करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
पलाश मुछाल यानेच दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली आहे. इंदूर स्टेट प्रेस क्लबच्या एका कार्यक्रमात संवाद साधताना पलाशने ही माहिती दिली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पलाश म्हणाला की, मला फक्त एवढंच सांगायचे की ती खूप लवकरच इंदूरची सून होईल. यानंतर उपस्थितांनी अभिनंदनाचा वर्षाव करताच त्याने मी तुम्हाला हेडलाईन दिली आहे, असेही तो म्हणाला.
विशेष म्हणजे इंदूरच्या होळकर मैदानावर हिंदुस्थान आणि इंग्लंडच्या महिला संघात सामना रंगणार आहे. या लढतीसाठी स्मृतीही इंदूरमध्ये आहे. त्याचवेळी पलाशने ही ब्रेकिंग न्यूज दिली. त्यामुळे महिला वर्ल्डकप संपताच दोघांच्या लग्नाचा बार उडणार असल्याची चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
दरम्यान, स्मृती मानधना ही 27 वर्षांची असून पलाश मुछाल 29 वर्षांचा आहे. स्मृती हिंदुस्थानची आघाडीची फलंदाज आहे. तिने नुकताच सर्वात वेगाने 5 हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यासह तिच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. तर पलाश हा संगीतगार आणि चित्रपट निर्माता आहे. त्याची बहीण पलक ही देखील गायिका असून सलमान खाल आणि हृतिक रोशन यासारख्या बड्या कलांकारांच्या चित्रपटात तिने गाणी गायली आहे.