
तेलंगणा सरकार राज्यातील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वयोमर्यादा २५ वरून २१ वर्षे कमी करण्याचा प्रस्ताव आणणार आहे. याबाबत माहिती देताना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले आहेत की, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वय २५ वरून २१ वर्षे करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची मागणी करणारा ठराव राज्य विधानसभेत मंजूर केला जाईल. ही काळाची गरज असून देशाच्या सक्रिय राजकारणात तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.
हैदराबाद येथील चारमिनार येथे आयोजित राजीव गांधी सद्भावना यात्रा स्मृतिदिन कार्यक्रमात आज मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असे म्हणाले आहेत. देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी राजीव गांधी यांनी सद्भावना यात्रेचे नेतृत्व केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. गांधी कुटुंबाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे आणि गांधी हा शब्द भारताचा समानार्थी आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना रेवंत रेड्डी यांनी विरोधी पक्ष बीआरएसवर हल्लाबोल केला आणि आगामी ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीत मते विभागण्याचे उद्दिष्ट ठेवून ते भाजपची बी-टीम असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसने भाजपसोबत एक गुप्त करार केला. लोकसभा निवडणुकीत २१ टक्के मते भाजपला हस्तांतरित होणे, हे बीआरएसच्या कट रचण्याच्या राजकारणाला सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.”