तुर्की-अझरबैजानकडे हिंदुस्थानी पर्यटकांनी फिरवली पाठ

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानची बाजू घेणाऱया तुर्की आणि अझरबैजानला हिंदुस्थानने चांगलाच धडा शिकवला आहे. हिंदुस्थानविरोधी भूमिका घेणाऱया या दोन्ही देशांमध्ये हिंदुस्थानी पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, अझरबैजानमध्ये ही घट अधिक आहे. अझरबैजानमध्ये मे-ऑगस्ट या कालावधीत हिंदुस्थानच्या पर्यटकांमध्ये 56 टक्के घट झाली आहे, तर तुर्कीमध्ये 33.3 टक्के घट झाली आहे.

हिंदुस्थानी-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाचा शस्त्रविराम झाल्यानंतर तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर अनेक प्रवाशांनी त्यांच्या सहली रद्द केल्या होत्या. हिंदुस्थान-पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर पर्यटक जॉर्जिया, सर्बिया, ग्रीस, थायलंड आणि व्हिएतनामसारख्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देत आहेत. ‘अझरबैजान आणि तुर्कीसाठी बुकिंगमध्ये (गेल्या आठवडय़ात) 60 टक्के घट झाली आहे, तर 250 टक्के पर्यटकांनी त्यांच्या सहली रद्द केल्या आहेत,’ असे मेकमायट्रिपच्या प्रवक्त्याने सांगितले.

z अझरबैजान पर्यटन मंडळाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, जानेवारी-एप्रिलमध्ये हिंदुस्थानी पर्यटकांची संख्या दरवर्षीपेक्षा 33 टक्क्यांनी वाढली होती, परंतु त्यानंतर चार महिन्यांत ती जवळपास 56 टक्क्यांनी घसरली आहे. z मे महिन्यात अझरबैजानने पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन केले, तर तुर्कीने पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा दिला होता. तुर्कीने पाकिस्तानला शस्त्रेही पुरवली होती.