
लहानपणीची एखादी आवड किंवा छंद पुढे जाऊन एखादी चळवळ कशी बनू शकते याची प्रचीती विहान तन्नन या मुंबईकर विद्यार्थ्याच्या रूपाने आली आहे. ‘लेगो’वर प्रेम करणाऱया या विद्यार्थ्याने अनोखे टूल किट तयार केले असून त्यातून कल्पक, सर्जनशील आणि खेळकर शिक्षणाची चळवळच उभी राहिली आहे.
बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असलेला
17 वर्षीय विहान लहानपणी ‘लेगो’शी (बुद्धीला चालना देणारी विशिष्ट प्रकारची खेळणी) खेळायचा. या खेळाने त्याला नवनिर्मितीची प्रेरणा दिली. प्रयत्नांचे महत्त्व आणि संयम शिकवला. पुढे ‘टीच फॉर इंडिया’ आणि ‘ऍडाप्ट’ या वंचित समूहातील मुलांना आधार देणाऱ्या संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून त्याने काम सुरू केले. तिथे त्याचा दृष्टिकोन बदलला. या संस्थांमध्ये असलेल्या मुलांचे शिक्षण केवळ परीक्षेवर आधारित असल्याचे त्याला आढळले. त्यात कल्पनाशक्तीला फारसा वाव नव्हता. हे चित्र बदलण्याचा निर्धार त्याने केला आणि मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी आठ नावीन्यपूर्ण ‘ब्रिक लार्ंनग टूल्स’ तयार केली.
विहानने बनवलेल्या टूल किटने जादू केली. मुलांचा शिक्षणातील सहभाग वाढला. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला. मुले स्वतःहून पुढे येऊन कल्पना सांगू लागले आणि नवे काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचा आत्मविश्वास वाढला. या टूल किटमुळे अडचणींतून मार्ग कसा काढायचा यावर ते विचार करू लागले. त्यामुळे विहानचाही उत्साह वाढला असून शिक्षण अधिकाधिक मजेदार, सर्वसमावेशक आणि व्यावहारिक बनवण्यावर त्याने लक्ष केंद्रित केले आहे. ब्रिक लार्ंनग टूलसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची त्यांची योजना आहे.


























































