
हिंदुस्थानची तरुण बॅडमिंटनपटू तन्वी शर्माला बीडब्ल्यूएफ जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिला थायलंडच्या अन्यापत फिचितप्रीचासक हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले, मात्र हे रुपेरी यशदेखील तिच्यासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरलीय.
अंतिम लढतीची सुरुवात थरारक होती. दोन्ही खेळाडू 2-2, 4-4 अशी बरोबरी राखत होत्या. मात्र तन्वीच्या काही चुकांमुळे थाई प्रतिस्पर्धीने 10-5 अशी आघाडी घेत पहिला गेम सहज जिंकला. दुसऱया गेममध्ये तन्वीने दमदार पुनरागमन करत 6-1 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर तिच्या चुका वाढल्या आणि थाई खेळाडूने अंतर कमी करत स्कोर 7-5 केला. मध्यंतराला तन्वी 8-5 ने पुढे होती; परंतु त्यानंतर फिचितप्रीचासकने नेटजवळच्या सुरेख खेळाच्या जोरावर दबाव आणत तन्वीला चुका करायला भाग पाडले. थाई खेळाडूने स्कोअर 8-8 वर आणला आणि त्यानंतर आत्मविश्वासपूर्ण खेळ करत अखेरीस सामना जिंकत जागतिक ज्युनियर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.