केस गमावले, पण वचन पाळले… जोरावरने पदक जिंकताच प्रशिक्षकाने केस कापले

खेळात दिलेलं वचन म्हणजे शब्द पाळायचाच आणि तोही असा की लोक म्हणावेत, हे काय खरंच झालं? हिंदुस्थानचा अनुभवी ट्रप नेमबाज जोरावर सिंह संधूने आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या (आयएसएसएफ) शॉटगन विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकत इतिहास घडवला आणि त्याच क्षणी त्याच्या कोचने अर्थात पीटर विल्सनने केस गमावले, पण
वचन जपले!

ब्रिटनचा माजी ऑलिंपिक विजेता आणि सध्या हिंदुस्थानचा परदेशी ट्रप नेमबाजी प्रशिक्षक असलेला पीटर विल्सनने काही आठवडे आधी आपल्या खेळाडूंना सांगितलं होतं, तुमच्यापैकी कुणीही विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकलं, तर मी डोकं मुंडवेन! हे ऐकून सर्वांनी हसण्यावारी घेतलं, पण 48 वर्षांच्या जोरावर सिंह संधूने नेमबाजीच्या पटावर असा अचूक नेम लावला की, विल्सनला खरोखरच न्हाव्याकडे धाव घ्यावी लागली.

कांस्यपदक जिंकल्यानंतर अथेंसच्या मैदानावर विल्सनचा चेहरा बघण्यासारखा होता. नेमबाजीचा सिंह असलेला हा कोच आता रेझर घेऊन स्वतःचं वचन पूर्ण करत होता. त्याने आनंदाने हसत म्हटलं, मी शब्द दिला होता आणि माझा खेळाडू त्याला खरा उतरला. आता माझी पाळी होती! त्याक्षणी विल्सनच्या चेहऱयावरचं समाधान आणि अभिमान हे कांस्यपदकापेक्षाही उजळ वाटत होतं.

2006 नंतर पुरुषांच्या ट्रप स्पर्धेत हिंदुस्थानला पदक मिळालं नव्हतं. पण 48 वर्षांच्या जोरावर सिंह संधूने सिद्ध केलं की वय हे फक्त आकडय़ाचं खेळ आहे, जिद्द आणि नेमबाजी अजूनही तितकीच टोकदार आहे. त्याच्या या ऐतिहासिक कांस्याने केवळ हिंदुस्थानचं नाव उजळलं नाही, तर ब्रिटिश कोचचं डोकंही “हलके’’ केलं!

आजचा दिवस केवळ नेमाचा नव्हता, तर “हेड शेव’’चाही होता. एका नेमबाजाच्या नेमाने लक्ष्यच नाही तर कोचचे केसही उडवले! खेळातील प्रेरणेला जर असा केसाळ शेवट मिळत असेल तर पुढच्या वेळी इतर कोचही म्हणतील, आमचंही वचन तयार ठेवा!