रेल्वेत 1100 पदांची भरती, दहावी पासांना नोकरीची सुवर्णसंधी

देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यावरून सरकारविरोधात रोष व्यक्त होत आहे. याचदरम्यान रेल्वे खात्यातील अॅप्रेंटीसच्या 1104 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात दहावीपासून आयआयटी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2025 आहे. रेल्वे भरती सेलने पूर्व रेल्वेच्या गोरखपूर विभागात अॅप्रेंटीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. याअंतर्गत 1104 रिक्त जागांसाठी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन रेल्वे भरती सेलने केले आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तसेच संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. भरती प्रक्रियेत वय वर्ष 24 ही कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट असेल. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज भरताना 100 शुल्क भरावे लागेल. महिला, दिव्यांग आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. गुणवत्ता यादीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल, असे रेल्वे भरती सेलमार्फत कळवण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱया दहावी, बारावी, आयआयटी उत्तीर्ण उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल, असेही रेल्वे भरती सेलने स्पष्ट केले आहे.