वरळीच्या महाकाली झोपडपट्टीत भीषण आग; 12 झोपड्यांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

वरळीच्या महाकाली भागात असलेल्या झोपडपट्टीत आज शॉर्टसर्किटनंतर सिलिंडरचा स्पह्ट होऊन भीषण आग लागली. या आगीत 12 झोपडय़ांचे मोठे नुकसान झाले. स्फोट झालेल्या घरातील मंडळी साईबाबांच्या पालखीसाठी घराबाहेर गेल्याने बचावले.

वरळी सी फेस परिसरात ही महाकाली झोपडपट्टी आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या. शॉर्टसर्किटमुळे दोन सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे तपासणीत समजले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने आमदार सुनील शिंदे यांना संपर्क साधून घटनास्थळी पोहोचून मदत करण्याच्या सूचना दिल्या. सुनील शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सुमारे दोन तास घटनास्थळी मदतकार्य केले. त्याबद्दल विभागातील नागरिकांनी शिवसेनेचे आभार व्यक्त केले आहेत.