शनिवारवाड्यात नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल… हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

ऐतिहासिक शनिवार वाडय़ात नमाज पठण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाटय़ाने व्हायरल झाला. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून शनिवारवाडा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शनिवारवाडय़ामध्ये नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱयांनी शनिवार वाडय़ात आंदोलन  केले. ज्या जागेवर नमाज पठण केले गेले त्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली. तसेच शेणाने सारवून जागा शुद्ध करण्याचा विधीही पार पाडला.

आंदोलनादरम्यान शनिवार वाडा परिसरात असलेल्या मशिदीवर भगवा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न झाला. त्यादरम्यान पोलीस आणि आंदोलकांची झटापट झाली. यानंतर शनिवारवाडय़ात ‘शिववंदना’ सादर करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना भविष्यात सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. शनिवार वाडय़ात नमाज पठण चालणार नाही. आता हिंदू जागृत झाला आहे, असे कुलकर्णी म्हणाल्या.