मुद्दा – भेसळयुक्त मिठाई

>> मोक्षदा घाणेकर

नोएडातील सेक्टर 115 मधील एका मिठाई बनविणाऱ्या युनिटवर दिल्लीच्या अन्न सुरक्षा विभागाने हल्लीच छापा टाकून 1100 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करून ती जागेवरच नष्ट केली. याच विभागाने जीबी नगर परिसरात आणखी एका ठिकाणी छापा टाकून 180 किलो भेसळयुक्त मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त केले. जयपूरच्या अन्न सुरक्षा विभागानेही अशाच एका कारवाईत 350 किलो भेसळयुक्त मिठाई, 650 किलो बनावट मिल्क केक आणि 500 लिटर नकली दूध जप्त करून ते नष्ट केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील अन्न आणि औषध प्रशासनाने ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ मोहिमेच्या अंतर्गत 36 लाख रुपयांचा तब्बल 30 हजार किलो निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला. दूध, मिठाई, तूप, पनीर, फरसाण यांसारख्या पदार्थांचे नमुने तपासले असता अनेक ठिकाणी भेसळ आढळली. दिवाळी जवळ आली की, मिठाईत भेसळ करून ती चढय़ा दरात विकणाऱ्यांचे सर्वत्र पेव फुटते. भेसळयुक्त पेढे किंवा मिठाई खाल्यास घशात खवखव होते, खोकला येतो आणि पोटात दुखते. चक्कर येणे, पोटात मळमळणे, उलटी, जुलाब सुरू होणे यांसारखे परिणाम जाणवू लागतात. काविळीसारख्या आजाराची लागण होऊ शकते.  किडनी आणि यकृतावरही भेसळयुक्त मिठाईचा गंभीर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही, तर विषबाधा अधिक झाल्यास खाणाऱयाचा मृत्यूही ओढावू शकतो. भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. कृत्रिम दुधात युरियाची भेसळ असल्यास युरियातील नायट्रोजनमुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय निकामी होऊ शकते. मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे दूध केमिकलयुक्त असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत निष्पन्न झाल्यास भारतीय दंड विधान 328 कलमान्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. मिठाईसाठी वापरण्यात आलेल्या दुधात पाणी आणि दुधाची पावडर मिक्स केल्याचे आढळल्यास 262 कलमान्वये गुन्हेगारास आर्थिक दंड ठोठावण्यात येतो. असे असूनही प्रतिवर्षी मिठाईत केल्या जाणाऱया भेसळीचे प्रमाण कमी न होता दरवर्षी त्यामध्ये वाढच होत आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी भेसळयुक्त मिठाई सर्रासपणे विकली जाते. आर्थिक लाभासाठी पामतेलाचा वापर करून खवा बनवणे. कृत्रिम आणि केमिकलयुक्त दूध तयार करून त्यापासून मिठाई बनवणे यांसारखे प्रकार सणासुदीच्या काळात प्रकर्षाने घडतात. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा महाभागांना खरे तर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा ही मंडळी कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन निर्दोष सुटतात किंवा जामिनावर बाहेर पडतात. यामध्ये कायद्याचे भय न राहिल्याने दरवर्षी भेसळयुक्त मिठाई बनवून विकणाऱ्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. त्यांना कायमस्वरूपी वचक बसण्यासाठी कठोर कायद्यासह जनमानसांत जागृती होणे गरजेचे आहे.