मुंबई जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर, बीकेसीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकांवर

सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचे वातावरण असतानाच सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदवली गेली. शहर आणि उपनगरांत अनिर्बंध फटाके फोडले गेल्याने प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ झाली. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 334 अंकांवर गेला, तर संपूर्ण शहराचा एक्यूआय 187 नोंद झाला. त्यामुळे मुंबई हे जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे.

सोमवारी सकाळी अभ्यंगस्नानचा उत्साह साजरा करताना मुंबईकरांनी मोठय़ा प्रमाणावर फटाके फोडले. त्याने आधीच खराब झालेली हवा आणखी प्रदूषित बनली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) शहरातील 24 एक्यूआय मॉनिटरिंग स्टेशन्सवर हवेची गुणवत्ता तपासली. त्यापैकी नऊ केंद्रांवर खराब ते अत्यंत खराब श्रेणीत हवेची गुणवत्ता नोंद झाली.

त्या नोंदीनुसार सर्वाधिक एक्यूआय बीकेसी येथे 334 अंकांवर पोहोचला. त्यापाठोपाठ कुलाबा नेव्ही नगर-274, देवनार-268, विलेपार्ले-264, अंधेरी-पूर्व – 257, माझगाव-240, वांद्रे पूर्व (खेरवाडी) -238, मालाड -214 आणि वरळी येथे 201 अशाप्रकारे एक्यूआयची नोंद झाली. या सर्व आकडेवारीवरून नोंदवण्यात आलेला संपूर्ण शहराचा 184 अंकांवरील एक्यूआय 10 ऑक्टोबरला मान्सूनने एक्झिट घेतल्यापासूनचा सर्वात खराब मानला जात आहे. मान्सूनने एक्झिट घेतल्यापासून मुंबईच्या हवेचा दर्जा खालावत चालला आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वी प्रदूषणकारी उद्योगांवर निर्बंध लादणे आवश्यक होते. त्यात सरकार अपयशी ठरले. त्यामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाल्याचे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले आहे.

हवेची गुणवत्ता आणखी ढासळणार

मुंबईच्या हवेची गुणवत्ता येत्या काही महिन्यांत आणखी ढासळेल. हवामानाच्या ‘ला-निना’ स्थितीचा गुणवत्ता निर्देशांकावर मोठा परिणाम होईल. ‘ला निना’ स्थितीदरम्यान वातावरणीय अभिसरणातील बदलांमुळे वाऱयाचा वेग कमी होतो. त्यामुळे प्रदूषकांना वेळीच रोखता येत नाही. मुंबईसारख्या किनारपट्टीलगतच्या शहरांत ती प्रदूषके हवेत जास्त काळ टिकून राहतात, असे तज्ञांनी म्हटले आहे.