‘अंग्रेजो के जमाने का जेलर’ काळाच्या पडद्याआड, असरानी यांचे निधन

कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत पाच दशके प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. फुप्फुसाच्या आजारामुळे जुहू येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शोले’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली जेलरची भूमिका अजरामर ठरली. ‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है’ हा त्यांचा डायलॉग आजही लोकप्रिय आहे. असरानी यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली असून ‘तीन पिढ्यांना हसवणारा हरहुन्नरी कलाकार हरपला’, अशा शब्दांत हळहळ व्यक्त होत आहे.