
महिला विश्वचषकात आतापर्यंत अपराजित वाटचाल करणाऱ्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाला प्रचंड धक्का बसला आहे. संघाची कर्णधार आणि जबरदस्त फॉर्मात असलेली सलामी फलंदाज एलिसा हिली पोटरीच्या दुखापतीमुळे बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नाही. तिच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ताहलिया मॅकग्रा संघाचे नेतृत्व करणार आहे.
शनिवारी झालेल्या सराव सत्रादरम्यान हिलीला पोटरीत ताण आला होता आणि वैद्यकीय तपासणीनंतर संघ व्यवस्थापनाने तिची विश्रांती अनिवार्य ठरवली आहे. ऑस्ट्रेलियाची मुख्य प्रशिक्षक शेली निश्चेके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “होय, हे नक्कीच दुर्दैवी आहे. हिलीच्या पोटरीत हलका ताण आहे, पण आम्ही तिच्या लवकर बरी होण्याची आशा बाळगतो.’’