सार्कोझी यांना पाच वर्षे तुरुंगवास, फ्रान्समध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्टाचार; लिबियाकडून कोटय़वधी युरो घेतले

निवडणूक जिंकण्यासाठी लिबियाकडून कोटय़वधी युरोचा निधी घेतला. अवैधमार्गाचा अवलंब करून भ्रष्टाचार केला. यामुळे फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि एक लाख युरोचा दंड ठोठावला आहे. शिक्षेची तत्काळ अंमलबजावणी करताना सार्कोझी यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. फ्रान्सच्या इतिहासात माजी राष्ट्राध्यक्षांना तुरुंगात डांबण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सार्कोझी हे 2007 ते 2012 या काळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. ही निवडणूक जिंकण्यासाठी सार्कोझी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला. लिबियाचे हुकूमशाह मुअम्मर अल-गद्दाफी यांच्याकडून सार्कोझी यांनी मोठा निधी घेतला. याप्रकरणी तपास करण्यात आला आणि विशेष न्यायालयात खटला सुरू होता. न्यायालयाने सार्कोझी यांना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख युरोचा दंडही ठोठावला.

दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर सार्कोझी यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पॅरिसमधील ला सांते तुरुंगात विशेष विभागात त्यांना ठेवले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इतर पैद्यांपासून त्यांना एकटे ठेवले जाणार आहे.

गद्दाफी यांच्या मुलामुळे घोटाळा उघड झाला

2013 मध्ये गद्दाफी यांचा मुलगा सैफ अल इस्लाम याने सार्कोझी यांनी वडिलांकडून 2007 मध्ये निवडणुकीसाठी कोटय़वधी युरो घेतल्याचा आरोप केला. लेबनीज व्यापारी झियाद तकियेद्दीन यांच्याकडूनही सार्कोझी यांनी पैसे घेतल्याचाही दावा केला होता. या आरोपांमुळे फ्रान्सच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. चौकशीनंतर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने अवैध पद्धतीने निवडणूक लढवून गुन्हेगारी कटात सहभागी झाल्याचा ठपका सार्कोझी यांच्यावर ठेवला आणि पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, सार्कोझी यांनी आरोप फेटाळताना सुडबुद्धीने केलेले आरोप असल्याचे म्हटले आहे.