IND vs AUS – कोहलीचे निवृत्तीचे संकेत की केवळ चुकलेलं टायमिंग?

एकेकाळी जगातल्या प्रत्येक गोलंदाजाची रात्रीची झोप उडवणारा विराट कोहली सध्या स्वतःच्या बॅटचा आवाज विसरल्यासारखा भासतोय. हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीने असा परफॉर्मन्स केला की त्याला ‘रनमशीन’ नव्हे, तर ‘डक मशीन’ म्हणावे का, असा प्रश्न निर्माण झाला. पर्थपाठोपाठ अॅडलेड या दोन्ही ठिकाणी सलग भोपळा! कोहलीच्या अफाट कारकीर्दीत हा पहिलाच ‘डबल डक’ प्रकार होता. अवघ्या चार चेंडूंत पॅव्हेलियनचा रस्ता धरल्यावर जेव्हा तो हात हलवत निघाला तेव्हा प्रेक्षकांनी समजलं, हे निवृत्तीचे संकेत आहेत आणि संपूर्ण सोशल मीडियावर लगेच शंखनाद झाला, विराट निवृत्त होणार! काहींना वाटलं तो फक्त निराश झाला होता, पण काहींनी ठरवलं की विराट आता ‘इमोशनल आऊट’ झाला आहे.

कोहलीला कमी लेखणं चुकीचे आहे. या माणसाने पूर्वीही कित्येक वेळा स्वतःला सिद्ध केलंय. कोसळल्यानंतर पुन्हा अनेकदा ‘विराट’पणे उभं राहिला आहे. त्याच्याकडे अनुभव आहे, फिटनेस आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहंकारी आत्मविश्वास आहे. फक्त एक मोठी खेळी झाली की, पुन्हा एकदा तो सर्वांना आठवण करून देईल. मी अजून संपलेलो नाही.

स्पर्धा वाढली अन् आत्मविश्वास खचला

हिंदुस्थानच्या सध्याच्या संघात यशस्वी जैसवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर अशी तरुण फौज सतत धावांच्या फटाक्यांनी प्रकाश पाडतेय. निवड समितीचे लक्ष २०२७ च्या विश्वचषकाकडे आहे आणि कोहलीच्या बॅटमध्ये मात्र सध्या ‘सायलेन्सर’ बसवलेला दिसतोय.